मावळते अधिष्ठाता डॉ. गिरीश ठाकूर यांना “शावैम”तर्फे भावपूर्ण निरोप
जळगाव (प्रतिनिधी) : येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या अधिष्ठातापदाचा पदभार डॉ. सदानंद भिसे यांनी शुक्रवार दि. २१ जून रोजी सकाळी ११ वाजता स्वीकारला. मावळते अधिष्ठाता डॉ. गिरीश ठाकुर यांनी त्यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करीत पदभार दिला. त्यानंतर घेण्यात आलेल्या समारंभात डॉ. गिरीश ठाकूर यांना भावपूर्ण निरोप देण्यात आला.
अधिष्ठाता डॉ. गिरीश ठाकूर यांची बदली अलिबाग येथे त्यांच्या मूळ पदावर झाली. तर जळगावच्या अधिष्ठातापदी परभणी येथील न्यायवैद्यकशास्त्र विभागाचे प्रा. डॉ. सदानंद भिसे यांची नियुक्ती राज्य शासनाच्या वैद्यकीय शिक्षण विभागाने गुरुवार दि. २० रोजी डॉ. सदानंद भिसे यांनी शुक्रवार दि. २१ जून रोजी सकाळी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या अधिष्ठाता पदाचा पदभार मावळते अधिष्ठाता डॉक्टर गिरीश ठाकुर यांच्याकडून स्वीकारला.
यानंतर महाविद्यालयाच्या सभागृहामध्ये डॉ. गिरीश ठाकुर यांचा निरोप समारंभ घेण्यात आला. समारंभामध्ये मंचावरती दोन्ही अधिष्ठाता, उप अधिष्ठाता डॉ. मारोती पोटे, डॉ. किशोर इंगोले, प्रभारी वैद्यकीय अधीक्षक डॉ. संजय बनसोडे, अतिरिक्त वैद्यकीय अधीक्षक डॉ. धर्मेंद्र पाटील, अधिसेविका प्रणिता गायकवाड उपस्थित होते. यावेळी डॉ. ठाकूर यांनी शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सन्मान केला. तसेच डॉ. ठाकूर यांचाही सन्मान नवीन अधिष्ठाता डॉ. भिसे यांनी केला.
निरोप समारंभामध्ये मावळते अधिष्ठाता डॉ. गिरीश ठाकूर यांच्याविषयी डॉ. मारोती पोटे, डॉ. किशोर इंगोले, डॉ. संजय बनसोडे, डॉ. योगिता बावस्कर प्रणिता गायकवाड, डॉ. राजकुमार सूर्यवंशी यांनी मनोगत व्यक्त करून कृतज्ञता व्यक्त केली. यानंतर डॉ. ठाकूर यांनी भावपूर्ण सत्काराला उत्तर देताना सांगितले की, मला या दीड वर्षांच्या कारकिर्दीमध्ये सर्व विभागांनी उत्तम साथ दिली. सर्व कर्मचारी, परिचारिकांची रुग्णालयातील निस्वार्थी सेवा पाहून आनंद वाटला. अनेक विभागाला फक्त एक माणूस असतानाही त्यांनी रुग्णांना न्याय देण्याचा पूर्ण प्रयत्न केला.
महाविद्यालयामध्ये विद्यार्थ्यांना उत्तमोत्तम शिक्षण मिळण्यासाठी महाविद्यालयाची प्रगती झाली. पदव्यूत्तर कोर्सेस देखील सुरू झाले. डॉक्टर, कर्मचारी, परिचारिका यांचे मनोबल वाढवण्यास मी फक्त प्रोत्साहन दिले. त्यामुळे त्यांनी अधिकाधिक चांगले कार्य रुग्णसेवेप्रति केले, असेही डॉ. ठाकूर म्हणाले.
नवीन अधिष्ठाता डॉ. सदानंद भिसे यांनी सांगितले की, टीमवर्क महत्त्वाचे आहे. संघटित काम केल्यामुळे जळगावच्या महाविद्यालय व रुग्णालयाची मोठी प्रगती झाली आहे. अत्यंत मनमोकळेपणाने काम केल्यामुळे रुग्णसेवा दर्जेदार झाल्याचे देखील सांगत आगामी काळात महाविद्यालयाचा दर्जा आणखी चांगल्या पद्धतीने उंचावून त्यांचा नावलौकिक कायम ठेवण्याचे उद्दिष्ट राहील असे डॉ. भिसे यांनी सांगितले.
सूत्रसंचालन डॉ. धर्मेंद्र पाटील यांनी तर आभार डॉ. विलास मालकर यांनी मानले. कार्यक्रमासाठी महाविद्यालय व रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले