तात्काळ नुकसान भरपाई मिळण्याची मागणी
चंद्रकांत कोळी
रावेर (प्रतिनिधी) :- तालुक्यातील केळी व खरिपाची पिकांना अचानक आलेल्या वादळी वाऱ्यासह पावसाने मोठया प्रमाणावर पुन्हा एकदा भुई सपाट केले आहे. तालुक्यातील ३० गावांच्या शिवारातील केळी, कापुस, मका, तुर, चवळी, उडीद, मुग याचे ४७१ शेतकऱ्यांच्या सुमारे २५० हेक्टर क्षेत्रावर कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज महसुल व कृषी विभागातर्फे वरिष्ठांना पाठविण्यात आला आहे.
गेल्या दोन दिवसांपासून वादळी वाऱ्यासह पावसाने तालुक्याच्या शेती शिवाराला झोडपल्याने खिरोदे प्र, रावेर, रसलपुर, मुंजलवाडी, विवरे, बलवाडी, शिंगाडी, भामलवाडी, सिंगत, वडगाव, निंभोरा, ऐनपुर, निंबोल, मस्कावद, आभोडा खुर्द, जिन्सी, गुलाब वाडी, लालमाती इत्यादी गावांसह ३० ते ४० गावांचा समावेश आहे. निसर्गच कोपल्याने तालुक्यातील शेतकरी हतबल झाला असून दरवेळी होत असलेल्या नुकसानीमुळे आर्थिक बजेट कोलमडले आहे.
केळी हे मुख्य पीक म्हणून घेतले जाते. दोन वर्षे कालावधीचे पीक असल्याने दरवर्षी बळीराजाचे नुकसान होत आहे . अनेक वेळा नुकसानीचे पंचनामे करण्याचे काम झाले मात्र केळी नुकसानीची भरपाई म्हणून शासनाची मदत मिळाली नाही, विम्याची रक्कम त्वरित खात्यात थेट जमा झाली. परंतु ज्यांनी विमा काढलाच नाही अशा शेतकऱ्यांना शासकिय मदत कधी मिळेल असा सवालही शेतकरी करीत आहेत.