सतर्कतेचा इशारा ; अजंता पुलाजवळ कार गेली वाहून, चालक वाचला
जळगाव (प्रतिनिधी)- बुधवारी दिवसभर पावसाने ठिकठिकाणी रौद्ररूप धारण केलेले दिसून येत आहे. जळगाव जिल्ह्यातील पूर्व भागात, मुक्ताईनगर, रावेर, भुसावळ तसेच बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर येथे मात्र नद्यानाल्यांना मोठा पूर आला आहे. रावेर येथे तर एकजण वाहून जात होता, मात्र त्याला वाचविण्यात आले आहे. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून नागरिकांनी नदीकाठ, पुलांपासून सावध राहावे अशी माहिती शासनातर्फे देण्यात आली आहे.
रावेर लोकसभा मतदारसंघातील रावेर, भुसावळ, मुक्ताईनगर, मलकापूर येथे सर्वत्र नद्या नाल्यांना पूर आला आहे. पूर्णा, भोकर, फारशा नाला, सुकी नदी या उत्तरेकडून दक्षिणेकडे तापी नदीत मिसळतात. रावेर तालुक्यातील गारबर्डी, मंगरूळ अशी धरणे देखील पूर्ण भरून वाहत आहेत. एक कार अजंता पुलाजवळ वाहून जात असताना त्यातील चालकाने उडी मारल्याने तो वाचला. मात्र वाहून जात असताना त्याला लोकांनी वाचवले. तर कार मात्र वाहून गेली आहे.
वडगावजवळ नाल्याला पूर आल्याने रावेर-सावदा या रस्त्यावरील वाहतूक खंडित झालीआहे. पावसामुळे खिर्डीच्या नाल्याला पूर आल्याने संपूर्ण बसस्थानक परिसर पाण्याखाली गेला आहे. यामुळे बलवाडी, निंभोरा, भामालवाडी या गावांकडे जाणारी वाहतूक खंडीत झाली आहे. या भागातील काही घरांमध्ये पाणी घुसले असून दोन तीन व्यावसायिकांच्या टपऱ्या पुरात वाहून गेल्याची माहिती मिळाली आहे. उटखेडा कुंभारखेडा रस्त्यावरील सुकी नदीला पूर असल्याने उटखेडा-कुंभारखेडा, पाल-खिरोदा, या रस्त्यांवरील वाहतूक बंद पडली आहे. सावदा-थोरगव्हाण रस्त्यावर पाणी असल्याने हा रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. या ठिकाणी काही घरांमध्ये पुराचे पाणी गेल्याचे समजते. विवरे येथील वाघाडी नाल्याला पूर आल्याने अनेक घरांमध्ये पाणी आहे. त्यामुळे नागरिकांच संसारोपयोगी साहित्याचे नुकसान झाले आहे.
तहसीलदार बंडू कापसे पूर परिस्थितीची पाहणी करण्यासाठी रवाना झाले आहेत. पाहणीनंतर नुकसानीचे पंचनामे तात्काळ करण्यात येणार आहेत. अतिवृष्टी पावसामुळे चिनावल, खिरोदा, कुभारखेडा परिसरात खरिपाच्या हंगामासह, बागायती पिकांना मोठा फटका बसला आहे या मुळे शेतकर्यांचे मोठे नुकसान झाले आहे. चिनावल येथील सुमारे शेकडो हेक्टर जमीनीवर पाण्याचे तलाव साचले असून गावाच्या चारही बाजूने पाण्याने वेढा टाकल्याने संपूर्ण वाहतूकसह रहदारी मार्ग बंद पडला आहे यात ग्रमसथ, शेतकरी, विद्यार्थी यांची मोठी पंचाईत झाली होती. गावातील मुख्य रस्त्यावर पाण्याचा अति वेगाचा प्रवाह वाहत असल्याने प्रशासनाने दिला आहे तर पुढील काही तास ग्रामस्थांनी सावध राहण्याची गरज आहे.
मुक्ताईनगर तालुक्यातदेखील अनेक ठिकाणी पुलांवर पाणी आल्याने लोक भयभीत झाले आहेत. प्रशासनाने सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. तर मलकापूर येथे तलासवाडा फाटा मलकापूर महामार्ग, बसस्थानकामागील भाग, नांदुरा रोड, गजानन नगरी अशा भागात मोठ्या प्रमाणात पाणी साचलेले आहे. नागरिकांना जाणे मुश्किल झाले आहे. तहसील चौक ते नांदुरा रोड वाहतुकीसाठी बंद करण्यात आलेला आहे. सदर भागात पाणी भरलेला आहे कोणीही मोटर सायकल अथवा चारचाकी वाहने घेऊन जाण्याच्या त्या भागातून प्रयत्न करू नये. सुरक्षेच्या दृष्टीने सर्वांना माहीती द्यावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.