जळगाव जिल्ह्यातील सर्व तलाठ्यांवर जबाबदारी
जळगाव (प्रतिनिधी) : महसुल विभाग १०० दिवस कृती कार्यक्रम आराखडा अंतर्गत महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभागाने राज्यात “जिवंत सातबारा” मोहीम राबविण्याचा निर्णय घेतला आहे. या मोहिमेअंतर्गत, सातबारावरील मयत खातेदारांच्या वारसांच्या नोंदी अद्ययावत केल्या जाणार आहेत.
या मोहिमेचा मुख्य उद्देश मयत खातेदारांच्या वारसांना शेतजमिनी संबंधित कामकाजासाठी आवश्यक असणाऱ्या कागदपत्रांमध्ये वारसांची नोंद वेळेत व्हावी हा आहे. अनेकदा वारसांची नोंद नसल्यामुळे अडचणी येतात, त्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. जिल्ह्यातील ज्या नागरिकांच्या सातबारावर अशा नोंदी राहिल्या असतील त्यांनी तलाठ्याकडे जाऊन आपल्या नोंदी करून घ्याव्यात असे आवाहन जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी केले आहे.
या कार्यक्रमाच्या अनुषंगाने मयत खातेदारांच्या याद्या तलाठी यांचेमार्फत तयार करण्यात येत आहेत. संबंधित मयत खातेदार यांचे वारसांनी मृत्यू प्रमाणपत्र व वारसांची माहिती संबंधित तलाठी यांचेकडे द्यावी. या कार्यक्रमाच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी तहसीलदारांना समन्वय अधिकारी आणि जिल्हाधिकाऱ्याना नियंत्रण अधिकारी म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. विभागीय आयुक्त विभागीय स्तरावर देखरेख ठेवणार आहेत. सातबारावरील मयत खातेदारांच्या वारसांच्या नोंदीची प्रक्रिया करण्यासाठी आवश्यक असलेल्या सर्व वारस नोंदी घेऊन ७/१२ “जिवंत” म्हणजेच अद्ययावत करणेसाठी वर नमूद केल्याप्रमाणे विहित कालबध्द कार्यक्रम राबवावा व “जिवंत ७/१२” मोहिम यशस्वी होईल याची दक्षता घ्यावी, तसेच गावकऱ्यांनी आपआपल्या गावातील तलाठ्यांना भेटून “जिवंत ७/१२” मोहिमेचा उपयोग करून घ्यावा असे आवाहन जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी केले आहे.
मोहिमेचा कार्यक्रम
# १ एप्रिल, २०२५ ते ५ एप्रिल, २०२५ : तलाठी गावांमध्ये चावडी वाचन करून मयत खातेदारांची यादी तयार करतील.
# ६ एप्रिल, २०२५ ते २० एप्रिल, २०२५ : वारसांनी आवश्यक कागदपत्रे तलाठ्यांकडे जमा करायची आहेत. तलाठी पडताळणी करून वारस ठराव मंजूर करतील.
# २१ एप्रिल, २०२५ ते १० मे, २०२५: तलाठी वारस फेरफार तयार करतील आणि मंडळ अधिकारी ७/१२ दुरुस्त करतील.