गुवाहाटीला गेले असल्याची माहिती
जळगाव (प्रतिनिधी) : जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील हे सकाळपासून कोणाचे संपर्कात नाहीत, अशी माहिती मिळाली आहे. त्यांची तब्येत बरी नाही असे त्यांच्या कार्यकर्त्यांकडून सांगण्यात येत आहे. मात्र दुसऱ्या सूत्रांकडून आ.पाटील शिंदे यांच्या गटाकडे म्हणजेच गुवाहाटीकडे रवाना झाले असल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे जिल्ह्यामध्ये खळबळ उडाली असून एकनाथ शिंदे यांच्याकडे किती आमदार आहेत याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.
शिवसेनेची खानदेशातील मुलुख मैदान तोफ अशी ओळख असलेल्या गुलाबराव पाटील यांच्याबद्दल आता जिल्ह्यात उत्सुकता लागून आहे. मंगळवारी गुलाबराव पाटील हे मुंबईत उद्धव ठाकरे यांच्याकडे होते. मात्र आज सकाळी अचानक ते नॉट रिचेबल झाले आहेत, त्यांची तब्येत बरी नाही असे कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे. मात्र गुलाबराव पाटील यांच्यासह काही आमदार गुवाहाटीला गेले आहेत अशीही दुसर्या बाजूने माहिती मिळत आहे. त्यामुळे आता जिल्ह्यातील शिवसैनिकांसह पदाधिकाऱ्यांचा जनतेचे लक्ष लागून आहे