मतदारसंघात संपदा पाटील यांचा संपर्क-संवाद सुरू
जळगाव (प्रतिनिधी) : जळगाव लोकसभा मतदारसंघाची जागा महाविकास आघाडीमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला सुटली आहे. या पक्षाकडून उमेदवारांची चाचणी केली जात आहे. नुकतीच पक्षाने अधिकृत उमेदवारांची घोषणा केली. मात्र त्यात जळगावचे नाव अद्यापही सस्पेन्स आहे. या ठिकाणी आता भाजपकडून तिकीट कापलेल्या उन्मेष पाटील यांच्या पत्नी संपदा पाटील यांचे नाव चर्चिले जात आहे. तसेच मतदार संघात मतदारांशी संपदा पाटील यांनी संपर्क व संवाद देखील सुरू केलेला आहे. त्यामुळे त्यांच्या नावाबाबत घोषणा होण्याची शक्यता पक्षातील नेत्यांकडून वर्तवली जात आहे.
शिवसेना ठाकरे गटाकडून कुलभूषण पाटील, चाळीसगाव येथील प्रमोद पाटील, अमळनेर येथील ललिता पाटील यांच्यासह काही इच्छुक नावांवर पक्षाकडून चर्चा सुरू होती. मात्र भाजपची प्रस्थापित जागा पाडण्यासाठी, तुल्यबळ लढत देण्याकरिता सक्षम उमेदवार अद्यापही ठाकरे गट शोधत आहे. त्यात आता भाजपने नुकतेच तिकीट कापलेले उन्मेश पाटील या खासदारांच्या पत्नी संपदा पाटील यांच्या नावाविषयी आता चर्चा सुरू झालेली आहे.
संपदा पाटील यांनी मतदारसंघात गाठीभेटी व संपर्क मतदारांशी सुरू केलेला आहे. नुकत्याच झालेल्या होळी सणानिमित्त त्यांनी बंजारा समाजातील काही महिलांची गाठीभेटी घेतली. तसेच त्यांच्यासोबत सण देखील साजरा केला. मतदार संघात त्यांनी विविध पदाधिकाऱ्यांशी तसेच कार्यकर्त्यांची देखील चर्चा केली आहे. उन्मेष पाटील यांनी गेल्या पाच वर्षात खासदार म्हणून भरीव कामगिरी केली आहे.
तरीदेखील भारतीय जनता पक्षाने त्यांचे तिकीट कापून स्मिता वाघ यांना दिले. त्यामुळे पक्षांतर्गत मोठी नाराजी बघायला मिळत आहे. यामुळे उन्मेष पाटील यांच्या लोकप्रियतेचा व कामांचा धडाका पाहून आता शिवसेना ठाकरे गट त्यांना त्यांच्याकडून तिकीट देण्याचे तयारीत आहे. पण जर उन्मेश पाटील यांनी नाकारले तर त्यांच्या पत्नी संपदा पाटील यांना तिकीट देण्यात येणार आहे. याबाबत जोरदार हालचाली सुरू झाल्या असून संपदा पाटील यांना लोकसभा मतदारसंघासाठी एकदा संधी द्यावी अशी मागणी जोर धरू लागली आहे. उध्दव बाळासाहेब ठाकरे यांचा उमेदवार हा भाजपचा राहील असी चर्चा आता जळगाव लोकसभा मतदारसंघात आहे. यामुळे सौ. संपदा पाटील यांचे नाव आघाडीवर आहे. अधिकृत घोषणा बाकी आहे.