
स्व. सुरेश गांधी यांच्या १२ व्या पुण्यतिथीनिमित्त गांधी परिवाराचा स्तुत्य सामाजिक उपक्रम
जळगाव (प्रतिनिधी) : स्वर्गीय सुरेश गांधी यांच्या १२ व्या पुण्यतिथीनिमित्त जळगाव येथील उत्कर्ष मतिमंद विद्यालयातील बौद्धिक दिव्यांग विद्यार्थ्यांना थंडीपासून संरक्षण मिळावे आणि त्यांच्या चेहऱ्यावर आनंद फुलावा, या उद्देशाने सुमीरा गांधी परिवाराच्या वतीने उबदार वूलन टोप्यांचे वाटप करण्यात आले. या सेवाभावी उपक्रमातून समाजातील दिव्यांग विद्यार्थ्याप्रती आपुलकी आणि सामाजिक बांधिलकीचा संदेश देण्यात आला.

एखाद्या व्यक्तीच्या स्मृती केवळ शब्दांतून नव्हे, तर समाजासाठी केलेल्या सेवाकार्यातून अधिक जिवंत राहतात. आपल्या प्रिय व्यक्तीचा पुण्यस्मरण दिन गरजू व विशेष विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलवून साजरा करणे, हीच खऱ्या अर्थाने श्रद्धांजली ठरते, अशी भावना या उपक्रमातून व्यक्त करण्यात आली. हा उपक्रम सीमा अजयकुमार गांधी, रिकेशचंद्र सुरेश गांधी, सायली पियुष गांधी आणि डॉ. अश्विनीकुमार काळुंखे यांच्या वतीने राबविण्यात आला.
यावेळी समाजातील दानशूर व्यक्ती, संस्था आणि नागरिकांनीही पुढे येऊन या विशेष विद्यार्थ्यांच्या जीवनात आनंदाचे क्षण निर्माण करण्यासाठी मदतीचा हात द्यावा, असे आवाहन करण्यात आले. विशेष विद्यार्थ्यांना दिलेली छोटीशी मदत त्यांच्या चेहऱ्यावर मोठे हास्य फुलवू शकते आणि आपुलकीचा हात त्यांच्या आयुष्यात आत्मविश्वासाची नवी उमेद निर्माण करू शकतो, असे नमूद करण्यात आले.
या प्रसंगी उत्कर्ष मतिमंद विद्यालयाचे मुख्याध्यापक संजय बोरसे, शिक्षक तसेच शिक्षकेतर कर्मचारी वृंद उपस्थित होते. कार्यक्रमाच्या शेवटी स्व. सुरेश गांधी यांच्या स्मृतींना विनम्र अभिवादन करण्यात आले. तसेच या उपक्रमाबद्दल शाळेच्या वतीने सुमीरा गांधी परिवाराचे मनःपूर्वक आभार मानण्यात आले.








