पुणे (वृत्तसंस्था) – करोना काळातील निर्बंध शिथिल करत अनलॉकबाबतची नवी नियमावली सोमवारी जाहीर केली होती. राज्यभरातील जवळपास २५ जिल्ह्यांना दिलासा मिळाला होता. मात्र पुणे, साताऱ्यासह ११ जिल्ह्यांमध्ये निर्बंध कायम होते. या जिल्ह्यांत तिसऱ्या टप्प्यातील निर्बंध लागू होते. या निर्णयावर पुण्यातील व्यापारी महासंघाने नाराजी व्यक्त केली होती. आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बैठकीनंतर निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत. पुण्यातील सर्व दुकानं एक दिवस वगळता सकाळी ७ ते रात्री ८ पर्यंत सुरु ठेवण्याची परवानगी देण्यात आली आहे. तसंच पुण्यातील हॉटेल-रेस्तराँ सर्व दिवस रात्री १० पर्यंत सुरु ठेवता येणार आहेत. मॉल रात्री ८ पर्यंत सुरु ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. पण मॉल्समध्ये फक्त दोन लस घेतलेल्यांनाच प्रवेश दिला जाणार आहे. तर हॉटेल चालक आणि दुकानदारांना लशीचे दोन्ही डोस घेणं बंधनकारक करण्यात आलं आहे.