जिल्हाधिकारी, सीईओ यांच्या उपस्थितीत कार्याची प्रशंसा
जळगांव (प्रतिनिधी) :- जिल्ह्यातील शैक्षणिक गुणवत्तेच्या उन्नतीसाठी अत्यंत प्रभावी आणि दूरदृष्टीने काम करणारे प्राथमिक शिक्षण अधिकारी विकास पाटील यांची बदली बुलढाणा येथे झाल्यानिमित्त, एक भावनिक आणि गौरवपूर्ण निरोप समारंभ आयोजित करण्यात आला. या वेळी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद आणि मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करनवाल यांनी त्यांच्या कार्याची प्रशंसा करत, त्यांचे योगदान अत्यंत प्रेरणादायी असल्याचे मत व्यक्त केले.
जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागातर्फे मंगळवार दि. १० जून रोजी जिल्हा परिषदेच्या शाहू महाराज सभागृहात निरोप समारंभ आयोजित करण्यात आला होता. यावेळी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करनवाल, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रणधीर सोमवंशी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी स्नेहा पवार, भाऊसाहेब अकलाडे, मुख्य लेखा व वित्त अधिकारी बाबुलाल पाटील, माध्यमिक विभागाचे शिक्षण अधिकारी कल्पना चव्हाण, गणेश भोगावडे यांचे सह इतर अधिकारी व कर्मचारी यावेळी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी आयुष प्रसाद म्हणाले, “विकास पाटील यांनी आपल्या कामातून जिल्ह्यात आगळावेगळा ठसा उमटवला आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यातील शैक्षणिक गुणवत्ता लक्षणीयरीत्या वाढली. त्यांचे कार्य कायम स्मरणात राहील.” मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करनवाल यांनी देखील मनोगतातून विकास पाटील यांच्या कार्यशैलीचे आणि शिक्षण क्षेत्रातील योगदानाचे कौतुक करत, “त्यांनी दिलेले योगदान जिल्ह्याच्या शैक्षणिक वाटचालीत मोलाचे ठरले आहे. त्यांच्या कार्याची प्रेरणा भविष्यातही मार्गदर्शक ठरेल,” असे सांगितले. या समारंभात अनेक शिक्षण अधिकारी, शिक्षक, कर्मचारी आणि मान्यवर उपस्थित होते. सर्वांनीच विकास पाटील यांच्या कार्यकर्तृत्वाला सलाम करत, पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.