शिवसेना नेते गुलाबराव पाटील यांचे जळगाव तालुका महायुतीच्या मेळाव्यात कार्यकर्त्यांना आवाहन
शिवसेना नेते मंत्री गुलाबराव पाटील २४ ऑक्टोबरला उमेदवारी अर्ज भरणार !
जळगाव (प्रतिनिधी) :- महायुतीच्या प्रत्येक कार्यकर्त्याने निवडणुकीच्या बुथचे सूक्ष्म नियोजन करून एकजुटीने आपले गाव व आपला बूथ ही जबाबदारी पार पाडा. महायुतीचा भगवा फडकविण्यासाठी साठी सज्ज राहा. विरोधी उमेदवार कोण यापेक्षा महायुतीचा धनुष्यबाण हेच डोळ्यासमोर ठेवा. धरणगाव येथे २४ ऑक्टोंबरला उमेदवारी अर्ज दाखला करणार असुन हजारोंच्या संख्येने उपस्थिती द्यावी आणि महायुतीचा प्रत्येक कार्यकर्ता हा गुलाबराव पाटील आहे असे समजून काम करण्याचे आवाहन शिवसेना नेते गुलाबराव पाटील यांनी केले. त्यांनी विरोधकांना चिमटे घेत टोलेही लगावले.
जळगाव तालुक्याचा महायुतीच्या कार्यकर्त्यांच्या मेळावा जळगाव येथिल आदित्य लॉन येथे पार पडला यावेळी ते बोलत होते. यावेळी, मंत्री गुलाबराव पाटील यांनी मतदार संघात विकास कामांचा डोंगर उभा केला असून विकास कामांची तटबंदी कोणीही भेदू शकत नाही, असे प्रतिपादन खा.स्मिता वाघ यांनी केले. भाजपाचे निरीक्षक नितीन पटेल यांनी सांगितले की, गुलाबराव पाटील आपल्या पाठीशी भाजपा खंबीरपणे उभे असल्याचे सांगत कार्यकर्त्यांनी बूथ जिंका – विजय पक्काचा नारा देत विजयाच्या रणनीती बाबत मार्गदर्शन केले.
भाजपाचे जिल्हाध्यक्ष ह.भ.प. ज्ञानेश्वर जळकेकर महाराज, रा.कॉ.चे जिल्हाध्यक्ष तथा जेडीसीसी बँकेचे चेअरमन संजय पवार, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख निलेश पाटील, महिला आघाडीच्या जिल्हाप्रमुख सरीताताई कोल्हे – माळी, सरचिटणीस योगेश देसले, भाजपा तालुकाध्यक्ष हर्षल चौधरी, रा. कॉ. चे तालुकाध्यक्ष भूषण पवार, सुभाष पाटील, माजी उपाध्यक्ष लालचंद पाटील यांनी सांगितले की, गुलाबभाऊ यांनी जाती – पातीच्या राजकारणाला थारा न देता केवळ विकास कामांसाठी झटले. गुलाबभाऊ म्हणजे कार्यकर्ते व माणसं जोडणारा तसेच नातं जोपासणारा नेता आहे.
महायुतीच्या मेळाव्याचे शेरोशायरीने प्रास्ताविक विधानसभा क्षेत्र प्रमुख संजय पाटील यांनी केले. सूत्रसंचालन तालुका प्रमुख शिवराज पाटील यांनी केले. आभार उपजिल्हा प्रमुख अनिल भोळे यांनी मानले. यावेळी आदित्य लॉन परिसरात भगवामय वातावरण होते. शिवसेनेचे जेष्ठ नेते गुलाबराव पाटील व मान्यवरांचे आगमन होताच फटाक्यांच्या आतषबाजीत कार्यकर्त्यांनी मोठ्या जल्लोषात त्यांचे स्वागत करण्यात आले.