जळगाव (प्रतिनिधी):- शहरातील आरएल हॉस्पिटलसमोर दोन भामट्यांनी पोलिस असल्याची बतावणी करत एका ज्येष्ठ व्यापाऱ्याची तब्बल ८० हजार रुपयांचे सोन्याचे दागिने हातचलाखीने लंपास केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून संशयितांचा शोध सुरू आहे.


याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, माधव पितांबर पाटील (वय ७१, रा. उल्हासनगर, जि. ठाणे) हे १० मे रोजी दुपारी जळगाव शहरातील आरएल हॉस्पिटल परिसरात आले होते. यावेळी दोन अनोळखी इसमांनी त्यांना गाठत स्वतःला पोलिस असल्याचे भासवले. परिसरात चेन चोरीच्या घटना वाढल्याचे सांगून त्यांनी पाटील यांच्या अंगावरील सोन्याचे दागिने सुरक्षित ठेवण्यासाठी कागदात गुंडाळून देतो, असे सांगितले.
भामट्यांनी विश्वास संपादन करत पाटील यांच्या अंगावरील सुमारे ८० हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने घेतले. त्यामध्ये साडेतीन तोळ्यांचे ब्रेसलेट, दोन तोळ्यांची सोन्याची चेन, पाच ग्रॅमच्या दोन अंगठ्या आणि सात ग्रॅमची एक अंगठी यांचा समावेश होता. मात्र हातचलाखी करत त्यांनी खरे दागिने बदलून बनावट वस्तू परत दिल्या आणि तेथून पसार झाले.
फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर पाटील यांनी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दिली. त्यानुसार भारतीय न्याय संहिता २०२३ अंतर्गत कलम ३१८(४), ३१९(२) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.









