चावा घेतल्याने तीन जण जखमी ; यावल शहरातील घटना
यावल (प्रतिनिधी) : शहरातील विस्तारित भागात पिसाळलेल्या कुत्र्याने धुमाकूळ घातला होता. या भागातील वृद्ध महिलेसह तिघांना जबर चावा घेतल्याने तिघे जण जखमी झाले आहेत. नगर पालिकेच्या कर्मचाऱ्यांना ही माहिती मिळताच त्यांनी या पिसाळलेल्या कुत्र्यास ठार केले आहे.
शहरात फैजपूर रस्त्यालगत विस्तारित भागात भास्कर नगरातील पाण्याच्या टाकी परिसरात शनिवारी व रविवारी एका पिसाळलेल्या कुत्र्याने ३ जणांना एकाच दिवशी चावा घेऊन जखमी केले. धुमाकूळ घालत तो दिसेल त्यांच्या अंगावर हल्ला केला. यामुळे अनेकांना पळत सुटावे लागले. या कुत्र्यांने लीलाबाई कौतिक पाटील (वय ६१), प्रांजल तलाशिया व सुरेश चिमणकर या तीन व्यक्तींना जबर चावा घेतला. यात तिघे जखमी झाले. इतर नागरिकांच्या मदतीने जखमींना कुत्र्याच्या तावडीतून सोडविण्यात आले. याबाबत भाजपाचे माजी शहराध्यक्ष नीलेश गडे यांनी तत्काळ नगर पालिका कर्मचाऱ्यांना पिसाळलेल्या कुत्र्याची माहिती दिली. तेव्हा कर्मचाऱ्यांनी दुपारी या कुत्र्यास ठार केले. पिसाळलेल्या कुत्र्यास ठार केल्यानंतर विस्तारित भागातील नागरिकांनी सुटकेचा निःश्वास घेतला.