शेतकऱ्यांनी लाभ घेण्याचे कृषी विभागाचे आवाहन
जळगाव (प्रतिनिधी) – पंतप्रधान पीक विमा योजना खरीप हंगाम २०२३-२४ मध्ये खरीप व रब्बी हंगामासाठी केवळ एक रुपयांमध्ये पीक विमा मिळणार असून अधिकाधिक शेतकऱ्यांनी विमा काढण्याचे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.
पीकविमा योजनेमध्ये भात (तांदुळ), बाजरी, भुईमूग, सोयाबीन, मुग, तुर, उडीद, कापुस, मका व कांदा ही पीके अधिसुचित करण्यात आली असून जळगाव जिल्ह्यासाठी ओरिएन्टल इन्शुरन्स कंपनी लि. ची नियुक्ती करण्यात आली आहे. विमा भरण्याचा अंतिम दिनांक ३१ जुलै २०२३ आहे. विमा हा महा-ई-सेवा केंद्रावर ऑनलाईन भरता येणार असून यासाठी सातबारा, ८-अ, आधार कार्ड, स्वयंघोषणापत्र, बँक पासबुक आदी कागदपत्रे आवश्यक आहेत. अर्ज भरण्यासाठी बँकांमध्ये होणारी गर्दी टाळून शेतकऱ्यांना अर्ज भरण्यास सुलभता व्हावी म्हणून गावपातळीवर अधिकची सुविधा उपलब्ध करुन देण्याचे कृषी विभागाने नियोजन केले आहे. यासाठी जिल्ह्यात कार्यान्वित आपले सरकार सेवा केंद्र (डिजिटल सेवा केंद्र) सुविधा केंद्रावर शेतकऱ्यांना अर्ज भरता येतील.
शेतकऱ्यांनी उप विभागीय कृषी अधिकारी, तालुका कृषी अधिकारी, मंडळ अधिकारी यांच्या कार्यालयाशी तसेच आपल्या गावातील कृषी पर्यवेक्षक, कृषी सहाय्य्क अथवा नजिकच्या बँकेशी संपर्क साधावा, असेही प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविण्यात आले आहे.