भुसावळ शहरातील घटना
भुसावळ (प्रतिनिधी) : पीडीत महिलेला मदत करण्याच्या बहाण्याने ६५ वर्षीय वयोवृद्धेचा विश्वास संपादन करीत तिला बोलण्यात गुंतवून तिच्या गळ्यातील ८७ हजारांचे दागिने लांबवण्यात आल्याची घटना दि. ३ मे रोजी सायंकाळी सहा वाजता घडली. अज्ञात दोन महिलांविरोधात बाजारपेठ पोलिसात गुन्हा शनिवारी दाखल करण्यात आला.
आशा वसंत निळे (वय ६५, रा. आवटे नगर, साकरी फाटा, भुसावळ) यांनी फिर्याद दिली आहे. दिनांक ३ मे रोजी सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास त्या जामनेर रोडवरून पायी जात असताना दोन अनोळखी महिलांनी त्यांना अडवत एका पीडीतेवर अन्याय झाल्याने तिला मदत करू, असे म्हणत अष्टभूजा डेअरीमागील गल्लीत नेले.
वृद्धेला बोलण्यात व्यस्त ठेवत तिची नजर चुकवून गळ्यातील १० ग्रॅमची सोन्याची पोत, १० ग्रॅमची अन्य दुसरी सोन्याची पोत, चार ग्रॅमचे कानातले, तीन ग्रॅमचे कानातील वेल व दोन ग्रॅमची सोन्याची अंगठी असा एकूण ८७ हजारांचा ऐवज लांबवला. दि. २२ जून रोजी आशा निळे यांनी बाजारपेठ पोलिसात तक्रार दिल्यावरून अज्ञात दोन महिलांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलीस निरीक्षक गजानन पडघन यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार निलेश चौधरी करीत आहेत.