शिरसोली रस्त्याच्या पंपावरील घटना
जळगाव (प्रतिनिधी) : पेट्रोलपंपावर काम करत असताना तेथील हिशोबातून १ लाख २ हजार ७०९ रुपयांचा अपहार करून पसार झालेल्या संशयित आरोपीला एमआयडीसी पोलिसांनी अटक केली आहे. त्याला दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली.
योगेश काळू राठोड (रा. सुभाषवाडी, ता. जळगाव) असे अटक करण्यात आलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे. शिरसोली रस्त्यावरील पेट्रोलपंपावर काम करत असताना ८ ऑगस्ट २०२३ ते १० ऑगस्ट २०२३ या दरम्यान योगेश राठोड याने पेट्रोलपंपाच्या हिशोबातून १ लाख २ हजार ७०९ रुपयांचा अपहार केला होता. या प्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. राठोड हा ३ एप्रिल रोजी सुभाषवाडी येथे आल्याची माहिती पोलिस निरीक्षक बबन आव्हाड यांना मिळाली. त्यानुसार रात्री पोउनि दत्तात्रय पोटे, सहाय्यक फौजदार अतुल वंजारी, पोहेकॉ जितेंद्र राठोड, पोहेकॉ समाधान टहाकळे, शुध्दोधन ढवळे, साईनाथ मुंढे यांनी त्याला अटक केली. त्याला गुरुवार दि. ४ एप्रिल रोजी न्यायालयात हजर केले असता न्या. वसीम देशमुख यांनी दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. सरकार पक्षातर्फे अॅड. स्वाती निकम यांनी काम पाहिले.