अमळनेर तालुक्यातील पातोंडा येथील घटना, पोलिसांची मध्यप्रदेशात कारवाई
अमळनेर (प्रतिनिधी) :- तालुक्यातील पातोंडा येथील विद्युत ठेकेदाराच्या भावाला लोखंडी पाईप आणि लोखंडी पहारने झालेल्या जबर मारहाणीत जखमी कैलास शामसिंग प्रजापती याचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याने संशयित आरोपींवर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अमळनेर पोलीस स्टेशनकडून दुर्गम डोंगरातून तत्परतेने खून करून पसार झालेल्या पाचही आरोपीना शिताफीने मध्यप्रदेशातून अटक केली आहे.
पातोंडा येथे वि. का. सोसायटीच्या गोदामात दि. २९ रोजी रात्री ८ वाजेच्या सुमारास विद्युत ठेकेदार राजेश शामसिंग प्रजापती (रा. खापरखेडा ता. पिपरिया जि नर्मदापुरम, मध्यप्रदेश) याचा भाऊ कैलास शामसिंग प्रजापती हा पातोंडा येथील वि. का.सोसायटीच्या गोदामात झोपला होता.(केसीएन)रात्री संशयित आरोपी सलीम उर्फ संदीप धुर्वे, गोपाळ धुर्वे, साहुलाल धुर्वे, पंकज सेलू उमरावसिंग, शिवम फुलसिंग यांनी कैलासला उठवून आताच्या आता ४० हजार रुपये दे म्हणून त्याच्याशी भांडू लागले. कैलासने त्यांना आता पैसे नाही. सकाळी पैसे देतो म्हणून सांगितले. याचा राग आल्याने चौघांनी कैलासला लोखंडी पाईप आणि लोखंडी पहारने कैलासच्या नाकातोंडावर, पायावर वार केले. तसेच दोन्ही हात फ्रॅक्चर केले.
त्यात कैलास बेशुद्ध झाला. हे पाहून संशयित आरोपी पळून गेले. दि. ३० रोजी सकाळी सुपरवायझर तिवारी मजुरांना घ्यायला गेले असता त्यांना कैलास बेशुद्ध अवस्थेत आढळून आला. त्याला तातडीने धुळे येथे सरकारी दवाखान्यात नेण्यात आले.(केसीएन)त्याची प्रकृती अतिशय गंभीर असल्याने त्याला इंदोर येथे दवाखान्यात दाखल करण्यात आले होते. मारहाणीत कैलास रात्रीपासून बेशुद्ध होता व गंभीर जखमी झाला होता. उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाल्याने आरोपींविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अमळनेर पोलीस स्टेशनचे निरीक्षक दत्तात्रय निकम यांनी तातडीने छिंदवाडा, मध्यप्रदेश व परिसरात आरोपींच्या शोधासाठी पथक रवाना केले होते.
पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम यांनी गुन्ह्यात खुनाचे कलम वाढवून पोलीस उपनिरीक्षक भगवान शिरसाठ, हेडकॉन्स्टेबल विजय भोई, पोलीस राहुल गोकुळ पाटील व राहुल नारायण पाटील यांना आरोपीना शोधायला पाठवले. आरोपी मध्यप्रदेशातील दुर्गम डोंगर भागात वेगवेगळ्या ठिकाणी पळून गेले होते. पोलीस पथकाने मोबाईल सेलचे गौरव पाटील आणि मिलिंद जाधव यांचे तांत्रिक सहाय्य घेत गोपाल साहुलाल धुर्वे (वय ३५), पंकज उमरावसिंग शिलु (वय २७), सलीम निर्मल शहा धुर्वे (वय २२), रोहित बुद्धसिंग शिलु (वय १९) आणि शिवम फुलसिंग शिलु (वय १८, सर्व रा. बीजाधाना पो. ईटावा ता. तामिया जि. छिंदवाडा, मध्यप्रदेश) याना मध्यप्रदेश पोलिसांच्या मदतीने सुमारे १०० ते १५० किमी परिसरातून विविध डोंगरदऱ्यातून अटक केली आहे.