जळगाव एलसीबीच्या पथकाची कारवाई
जळगाव (प्रतिनिधी) : कौटुंबिक वादातून पत्नीचा गळा आवळून हत्या करणारा संशयित पती अजीज सलीम शेख (वय ३५, रा. परळी, बीड, ह.मु. वरणगाव ता. भुसावळ)) याने रविवारी मध्यरात्री पत्नीचा निर्घृण खून करून पळ काढला होता. मात्र जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने त्याचा पुण्यात शोध घेऊन त्याला बेड्या ठोकल्या.
वरणगावजवळील वेल्हाळे शिवारातील एका वीटभट्टीवर सना अजीज शेख (वय २५) कुटुंबासह वास्तव्यास होती. तिचा पती अजीज शेख याला दारूचे व्यसन होते. तो वारंवार पत्नीवर अत्याचार करत असे. शनिवारी रात्रीही तो मद्यधुंद अवस्थेत घरी परतला आणि दोघांमध्ये जोरदार वाद झाला. या वादातून अजीजने सनाचा गळा आवळून तिचा खून केला आणि पसार झाला झाला. या घटनेची माहिती मिळताच वरणगाव पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करून संशयिताचा शोध सुरू केला. खून करून फरार झालेल्या अजीज शेखचा शोध घेण्यासाठी जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने कसून तपास सुरू केला. अखेर मंगळवारी दुपारी पुण्यात त्याला अटक करण्यात आली. पोलीस उपनिरीक्षक शरद बागल व कृष्णा देशमुख यांच्या नेतृत्वाखालील पथकाने ही कारवाई केली. पुढील तपास वरणगाव पोलीस करत आहेत.