यावल तालुक्यातील थोरगव्हाण येथील घटना
यावल (प्रतिनिधी) : थोरगव्हाण ता. यावल येथील रहिवासी तरुणाने घरात गळफास घेत आत्महत्या केली. शुक्रवारी ही घटना घडली. या प्रकरणी यावल पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
स्वप्निल देवीदास चौधरी (३०) असे मयत तरुण पतीचे नाव आहे. थोरगव्हाण येथे तो परिवारासह राहत होता. शुक्रवारी त्याने पत्नी पूनम हीस वेफर तळून मागितले होते. पत्नी किचनमध्ये वेफर्स करत असताना दुसऱ्या खोलीत त्याने आत्महत्या केली. पत्नी पूनम ही चिप्स द्यायला गेली असता हा प्रकार लक्षात आला. यावेळी पत्नीने एकाच हंबरडा फोडला. घटनेमागील कारण समजू शकले नाही.
स्वप्निल याला तातडीने यावल ग्रामीण रुग्णालयात आणले असता वैद्यकीय अधिकारी डॉ. तुषार सोनवणे यांनी तपासणी करून त्याला मृत घोषित केले. याप्रकरणी यावल पोलिस ठाण्यात विजय नवल चौधरी यांनी दिलेल्या खबरीवरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. तपास हवालदार अर्जुन सोनवणे करीत आहे.