जामनेर ( प्रतिनिधी ) – तालुक्यातील ओझर गावात दारूच्या नशेत पत्नीला उंदीर मारण्याचे विषारी औषध पाजून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला आहे. या संदर्भात पतीविरोधात जामनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कमलाबाई दिगंबर शेगर या महिला आपले पती दिगंबर तुकाराम शेगर यांच्यासह राहायला आहेत. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यात कौटुंबिक वाद होता. दरम्यान २ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजेच्या सुमारास पती-पत्नीमध्ये पुन्हा वाद झाला. यामध्ये दारूच्या नशेत दिगंबर तुकाराम शेगर यांनी पत्नी कमलाबाई शेगर यांना मारहाण करून गंभीर दुखापत केली तसेच त्यांना जीवेठार मारण्याचे उद्देशाने त्यांच्या तोंडात उंदीर मारण्याचे विषारी औषध पाजले. दरम्यान कमलाबाई यांची प्रकृती खालावल्याने त्यांना तातडीने जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी दाखल करण्यात आला. दरम्यान त्यांचे प्रकृती आता स्थिर आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पती दिगंबर तुकाराम शेगर यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक गणेश अहिरे हे करीत आहे.