जळगाव जिल्ह्यात ३०० ग्रामपंचायती होणार सक्षम, सीईओंचा पुढाकार
जळगाव (प्रतिनिधी) :- जळगाव जिल्ह्यातील ग्रामपंचायती पूर्णपणे सक्षम व समृद्ध व्हाव्यात यासाठी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल यांच्या पुढाकाराने ‘पंचायत सक्षमीकरण अभियान’ राबवण्यात येणार आहे. या अभियानाची औपचारिक घोषणा सोमवार, दि. १९ मे रोजी जामनेर तालुक्यातील हिवरखेडा बु. येथे पार पडलेल्या राष्ट्रीय ग्राम स्वराज्य अभियानाच्या आर्थिक विकास व उत्पन्न वाढ या घटकांतर्गत सोलर ड्रायिंग प्रोजेक्टच्या भूमिपूजन कार्यक्रमात करण्यात आली.
यावेळी जलसंपदा मंत्री ना.गिरीश महाजन, माजी जिल्हा परिषद सदस्य संजय गरुड, माजी अभियंता जे.के.चव्हाण यांच्यासह इतर अधिकारी व पदाधिकारी उपस्थित होते. या अभियानांतर्गत जळगाव जिल्ह्यातील ३०० ग्रामपंचायतींची निवड करण्यात आली असून, त्यांना प्रशासनिक, आर्थिक व तांत्रिकदृष्ट्या सक्षम बनविण्याचा निर्धार करण्यात आला आहे. या ग्रामपंचायतींमध्ये १ ते १४ नमुन्यांचे अद्ययावत संग्रहीकरण, नियोजनबद्ध विकास आराखडे, उत्पन्न वाढविण्याचे उपाय व शाश्वत विकासाचा मार्ग यांचा समावेश असेल. मुख्य कार्यकारी अधिकारी करनवाल यांनी आपल्या भाषणात सांगितले की, “गाव समृद्ध झाले तर जिल्हा प्रगती करतो. ग्रामपंचायतींचे सक्षमीकरण हे केवळ कागदोपत्री नसून, प्रत्यक्ष कृतीद्वारे गावांचे सर्वांगीण व समतोल विकास घडविण्याचे हे महत्त्वाचे पाऊल आहे.” हा उपक्रम राबवताना संबंधित पंचायत समित्या, ग्रामविकास अधिकारी, ग्रामसेवक आणि स्थानिक नागरिक यांचे सक्रिय सहकार्य घेतले जाणार असून, गावागावांत विकासाभिमुख वातावरण तयार होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.