धरणगाव तालुक्यात टहाकळी फाट्यावर घटना
जळगाव ( प्रतिनिधी ) –फोनवर बोलण्यासाठी रस्त्याच्या कडेला दुचाकी थांबवून उभा असलेल्या एका महाविद्यालयीन तरुणाच्या अंगावर कंटेनर पडून त्याचा मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. धरणगाव तालुक्यातील पाळधी बायपासजवळील टहाकळी फाट्यावर वळण घेताना तोल सुटलेला एक कंटेनर थेट दुचाकीवर पलटी झाल्याने २० वर्षीय विद्यार्थ्याचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना बुधवारी (९ सप्टेंबर) दुपारी तीन वाजेच्या सुमारास घडली.


किरण जनार्दन सोनवणे (वय २०, रा. दोनगाव, ता. धरणगाव) असे मृत तरुणाचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, किरण सोनवणे हा दोनगाव येथून जळगाव येथील महाविद्यालयात येण्यासाठी दुचाकीने निघाला होता. प्रवासादरम्यान मोबाईलवर कॉल आल्याने तो टहाकळी फाट्याजवळ रस्त्याच्या कडेला दुचाकी उभी करून फोनवर बोलत थांबला होता. याच वेळी तेथून वळण घेणाऱ्या एका भरधाव कंटेनरच्या चालकाचा ताबा सुटल्याने कंटेनर थेट किरणच्या अंगावर पलटी झाला. या भीषण अपघातात किरणचा जागीच मृत्यू झाला.
घटनेची माहिती मिळताच पाळधी दूरक्षेत्र पोलीस स्टेशनच्या कर्मचाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली.
किरणला तात्काळ जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात हलवण्यात आले, मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून त्याला मृत घोषित केले. मृत किरण हा आई-वडील आणि लहान भावासह दोनगाव येथे राहत होता. त्याच्या अचानक जाण्याने सोनवणे परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. पाळधी बायपास परिसरात सातत्याने होणाऱ्या अपघातांमुळे स्थानिक नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. घटनेनंतर पाळधी पोलिसांनी कंटेनर चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली होती.








