गोंदेगाव धरणात उडी घेवून केली आत्महत्या
जामनेर ( प्रतिनिधी ) – मुलीच्या शिक्षणासाठी पैसे नसल्याने वडिलांनी जमीन विक्री करण्याचा निर्णय घेतला. या जमिनीचा सौदा झाल्यानंतर पैसे देऊनही मावसाने त्यांची जमीन ही नावावर करून न दिल्याने जमीन विकता आली नाही. त्यामुळे आर्थिक विवंचनेतून वडिलांनी आत्महत्या केल्याची घटना जामनेर तालुक्यात घडली आहे. याप्रकरणी पहूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जामनेर तालुक्यातील शेंदुर्णी गावात संतोष सुरेश मराठे (वय-४७) वास्तव्याला आहे. संतोष मराठे यांचे मावसा वसंत रावण बागुल यांच्या प्लॉटची पैसे देवून खरेदी केली होती. मात्र पैसे दिल्यानंतरही मावसाने जमीन संतोष मराठे यांच्या वडीलांच्या नावावर केली नाही. दुसरीकडे संतोष मराठे यांच्या मुलीच्या शिक्षणासाठी पैसे लागत होते. त्यासाठी त्यांनी जमीन विक्री करायची होती. परंतू ही जमीन नावावर करून देण्यासाठी त्यांचा मावसा वसंत बागुल हा टाळाटाळ करीत होता. त्यामुळे त्यांनी या त्रासाला कंटाळून शेंदुर्णी शिवारातील गोंदेगाव धरणात उडी घेवून आत्महत्या केली. दरम्यान, मयत संतोष मराठे यांचे लहान भाऊ पंकज मराठे यांनी पहूर पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून संशयित आरोपी वसंत रावण बागुल याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक दिलीप पाटील करीत आहे.