एमआयडीसी पोलिसांची कामगिरी, ११ दुचाकी हस्तगत
जळगाव (प्रतिनिधी) – एमआयडीसी पोलिस स्टेशनच्या गुन्हे शोध पथकाने जळगाव, धुळे, नंदुरबार आदी जिल्ह्यातून मोटार सायकली चोरणा-या चोरट्यास ताब्यात घेत अटक केली आहे. त्याच्याकडुन ११ दुचाकी हस्तगत करण्यात आल्या आहेत.
गोपाल भाईदास शिरसाठ असे अटक करण्यात आलेल्या चोरट्याचे नाव असून तो पिळोदा ता. शिरपूर येथील रहिवासी आहे. एमआयडीसी पोलिस स्टेशनचे पो. नि. जयपाल हिरे यांना मिळालेल्या माहितीच्या आधारे धुळे जिल्ह्यातील पोलिसांच्या अभिलेख्यावरील अट्टल मोटार सायकल चोरट्यास जळगाव शहरातील अजिंठा चौफुली परिसरातून गुन्हे शोध पथकाने १३ जुलैच्या रात्री ताब्यात घेतले होते. त्याची सखोल चौकशी सुरु होती. त्याने दिलेल्या माहितीच्या आधारे एमआयडीसी पोलिस स्टेशनला दाखल मोटार सायकल चोरीचा गुन्हा उघडकीस आला. याशिवाय विविध शहरातून चोरी केलेल्या एकूण ११ मोटार सायकली देखील त्याच्याकडून हस्तगत करण्यात आल्या आहेत.
अटकेतील गोपाल भाईदास शिरसाठ याने हे गुन्हे त्याचा फरार साथीदार अमजद कुरेशी याच्या मदतीने केले असल्याचे कबुल केले आहे. अटकेतील गोपाल शिरसाठ यास न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने २० जुलै पर्यंत त्याला पोलिस कोठडी सुनावली. जळगाव शहरातील तांबापुरा परिसरातील राहणारा त्याचा फरार साथीदार अमजद कुरेशी याच्या मागावर पोलिस पथक आहे. अटकेतील गोपाल शिरसाठ याच्याविरुद्ध खानदेशात मोटार सायकल चोरीचे एकूण दहा गुन्हे दाखल आहेत.
पोलीस अधिक्षक एम राजकुमार, अप्पर पोलीस अधिक्षक चंद्रकांत गवळी, उपविभागिय पोलीस अधिकारी संदीप गावित यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक जयपाल हिरे व त्यांचे सहकारी सहायक पो.नि. अमोल मोरे, पोलिस उप. निरी. आनंदसिंग पाटील, पो उप निरी दिपक जगदाळे, सहायक फौजदार अतुल वंजारी, पोहेकॉ गणेश शिरसाळे, अलताफ पठाण, पोना विकास सातदिवे, किशोर पाटील, स्वप्नील पाटील, योगेश बारी, सचिन पाटील, पोकॉ हेमंत पाटील, चद्रकांत पाटील, ईश्वर भालेराव व पोहेकाँ चालक इम्तियाज खान आदींनी या कारवाईत सहभाग घेतला. या गुन्हाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक जयपाल हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस नाईक विकास सातदिवे करत आहेत.