भीषण अपघातात शालक-पाहुणा ठार, तर दोघे गंभीर जखमी
जामनेर तालुक्यातील सोनाळा रोडावरील घटना
पहूर (प्रतिनिधी) :- जामनेर तालुक्यातील सोनाळा फाट्याच्या पुढे रस्त्यावर टाटा ४०७ टेम्पो पलटी झाल्याने त्याखाली दुचाकीवरील तिघेजण दाबले गेले. या भीषण अपघातामध्ये दुचाकीवरील दोघांचा मृत्यू झाला असून तिसऱ्यावर जळगाव येथे उपचार सुरू आहेत तर टेम्पो चालकदेखील जखमी झाला आहे. या प्रकरणी पहूर पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रघुनाथ विठ्ठल चौधरी (वय ४२ रा. शेंदुर्णी ता. जामनेर) असे फिर्यादीचे नाव आहे. त्यांचा पुतण्या मयूर गणेश चौधरी (वय २५) आणि मयूरचे दाजी शंकर भगवान चौधरी (वय ३५ रा. माणिक नगर, धुळे) व त्यांच्यासोबत मयूर देवेंद्र गढरी (वय २४ रा. शेंदुर्णी) असे तिघेजण बुधवारी दि. ११ डिसेंबर रोजी त्यांची दुचाकी (एमएच १९ बीआर २१२६) ने जामनेरला गेले होते.(केसीएन)तेथून रात्री साडेअकरा वाजता सुमारास घरी परत जात असताना सोनाळा फाट्याच्या पुढे सोनाळा शिवारात रस्त्यावर ट्रक थांबा असलेल्या ठिकाणी पहुर कडून जामनेरकडे जात असलेल्या टाटा ४०७ टेम्पो क्रमांक (एमएच २०डीइ ४३१३) हा पलटी झाल्याने त्याखाली दुचाकी वरील मयूर चौधरी व त्याचे दाजी शंकर चौधरी यांचेसह मयूर गढरी हे दाबले गेले.
त्यात मयूर आणि शंकर चौधरी हे जागेवर मयत झाले तर मयूर गढरी याला गंभीर जखमी झाल्याने जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, टेम्पो चालक शेख सलीम शेख याकूब (रा. शिवना ता. सिल्लोड जि. छत्रपती संभाजीनगर) हा देखील गंभीर जखमी झाल्याची माहिती मिळाली आहे. दरम्यान, सदर रस्त्यावर व्यापारी पंकज प्रकाशचंद लोढा यांनी वाळवण्यासाठी निष्काळजीपणाने मका टाकून ठेवला होता. या मक्यामुळे मयूर चौधरी याची मोटरसायकल घसरून ते खाली पडले आणि समोरून भरधाव वेगात येणारी टाटा ४०७ ही वळण घेताना पलटी झाली.
त्याखाली जखमी दाबले गेले व त्यात मयत झाले. त्याकरिता सदर मका टाकणारा व्यापारी पंकज लोढा आणि टेम्पो चालक शेख सलीम शेख हे मरणास कारणीभूत असल्याचे फिर्यादीमध्ये म्हटले आहे. फिर्यादीनुसार पहुर पोलीस स्टेशन येथे दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. निरीक्षक सचिन सानप हे तपास करीत आहेत. दरम्यान, मका टाकणाऱ्या व्यापाऱ्याला पोलिसांनी यापूर्वी दोन वेळा समज दिली होती. मात्र व्यापाऱ्याने पोलिसांच्या सूचनेकडे दुर्लक्ष केल्याने आज दोन बळी गेले आहे.