ओळखीच्या व्यक्तीने पाळत ठेऊन गुन्हा केल्याचा संशय
पाचोरा (प्रतिनिधी) :- शहरातील रंगार गल्ली येथील व्यापाऱ्याच्या घरातील तिसऱ्या मजल्यावरील कपाटातून १० लाख रुपये अज्ञात चोरट्याने चोरुन नेल्याची घटना उघडकीस आली आहे. ओळखीच्या व्यक्तीने पाळत ठेऊन गुन्हा केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. व्यापाऱ्याच्या फिर्यादीवरून पाचोरा पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध चोरीचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
शहरातील रंगार गल्ली येथील रहिवाशी हरिओम चत्रभुज मोरे (वय – ६३) हे पत्नी व एका मुलासह रंगार गल्ली येथे वास्तव्यास आहेत. हरिओम मोर यांचे जामनेर रोडवरील जैन पाठशाळेसमोर किराणा दुकान आहे. शहरात प्लाॅटची सौदा पावती करायची असल्याने हरिओम मोर यांचा मुलगा किसन मोर याने प्लाॅटची सौदा पावती करण्यासाठी पैसे लागणार असल्याने १४ रोजी शहरातील वाल्मिक पाटील यांचेकडुन ५ लाख रुपये व १५ रोजी हरिओम मोर यांचे शालक संजयकुमार अग्रवाल रा. धुळे यांचेकडून ५ लाख रुपये असे १० लाख रुपये उसनवारी वर आणले होते. दरम्यान १७ रोजी सकाळी ९ वाजता हरिओम मोर यांनी १० लाखांची रोकड घराच्या तिसऱ्या मजल्यावरील कपाटातील तिजोरीत ठेवली होती.
हरिओम मोर व त्यांची पत्नी हे दुकान उघडण्यासाठी व किसन मोर हा जळगांव येथे एम. बी. ए. चे शिक्षण घेत असल्याने जळगांव येथे निघून गेला. सायंकाळी किसन मोर हा जळगांवहुन आल्यानंतर घरी न जाता थेट दुकानावर आला होता. रात्री दुकान बंद करून मोर परिवार घरी आले असता व तिसऱ्या मजल्यावर गेले असता कपाटाला चावी लागलेली दिसली. हरिओम मोर यांनी कपाट उघडुन बघीतले असता त्यांनी ठेवलेले १० लाख रुपये मिळुन आले नाही. सर्वत्र शोध घेऊनही रोकड मिळुन न आल्याने अखेर हताश झालेल्या हरिओम मोर यांनी पोलिस स्टेशन गाठत अज्ञात चोरट्याविरुद्ध चोरीचा गुन्हा नोंदविला. घटनेचा पुढील तपास पोलिस निरीक्षक राहुल खताळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक योगेश गणगे हे करीत आहे.