प्रशासनाच्या घुमजावमुळे नातेवाईकांना मनस्ताप
जळगाव ( प्रतिनिधी) :- आम्हाला आमच्या आईचा मृतदेह नेण्यासाठी अँब्युलंस करून द्या. सकाळी आम्हाला ऍम्ब्युलन्स देणार म्हणून सांगितले. आता मात्र सांगताय, कि रेल्वेने मृतदेह पाठविण्याची सोय करतो. आम्ही नेपाळी देशाचे म्हणून आमच्यासोबत हा भेदभाव का ? असा सवाल मृत कमला भंडारी यांच्या मुलाने प्रशासनाला केला होता. यामुळे प्रशासनाची काही काळ तारांबळ उडाली होती.
कमला नवीन भंडारी (वय ४२, रा. नेपाळ ह. मु. कुलाबा, मुंबई) असे मयत महिलेचे नाव आहे. पाचोरा ते जळगाव दरम्यान वडगाव बु. जवळ हा भीषण अपघात बुधवारी झाला होता. या अपघातात सुनेसह कमला भंडारी या प्रवास करीत होत्या. दुर्घटनेत कमला भंडारी यांचे शीर धडावेगळे होऊन मृत्यू झाला आहे. गुरुवारी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, जळगाव येथे त्याचा मुलगा तपेंद्र भंडारी हा मृतदेह घेण्यासाठी आला होता. यावेळी त्याने प्रचंड आक्रोश केला होता. प्रसारमाध्यमांनी प्रतिक्रिया विचारल्या असत्या, तपेंद्र भंडारी यांनी सांगितले कि, आम्हाला सकाळी सांगितले होते की, तुमच्या परिजनांचे मृतदेह शासकीय खर्चाने घरी पाठविले जातील. तुम्हाला अम्बुलन्स दिल्या जातील. मात्र आता त्यांनी रेल्वेतून मृतदेह पाठवू असे सांगितले.
प्रशासनाच्या घुमजाव भूमिकेमुळे तपेंद्रसह मृत लच्छी राम पासी यांचे मित्र संदीपकुमार प्रजापत यांनाही त्रास झाला आहे. त्यांनीही प्रसारमाध्यमांकडे भावनांना वाट मोकळी करून दिली. कमला भंडारी आणि लच्छी राम पासी यांचे नेपाळमधील गावे जवळ आहे. मात्र आम्हाला रुग्णवाहिका देण्यास नकार देऊन रेल्वेतून मृतदेह पाठवू म्हणून सांगितले आहे. तसेच, ज्या रेल्वेमुळे माझ्या आईचा मृत्यू झाला, त्या रेल्वेतून मला मृतदेह न्यायचा नाही असे म्हणत तपेंद्र भंडारी याने भावनांना वाट मोकळी करून दिली. यावेळी रेल्वे अधिकारी अजयकुमार आणि प्रांत विनय गोसावी यांनी त्यांना समाधानकारक उत्तरे दिली नाही. त्यामुळे भावना अधिक संतप्त झाल्याचे दिसून आले.
भारतीयांना एक, आम्हाला दुसरा न्याय का ?
जळगाव जिल्ह्यातील भाविक दरीत पडून मयत झाले. तेव्हा आमच्या सरकारकडून एअर ऍम्ब्युलन्सद्वारे मृतदेह नेण्याची सोय करून देण्यात आली. मात्र आता आमचे परिजन मृत्युमुखी पडले तेव्हा आम्हाला रेल्वेतून का पाठवितात ? आम्हाला साधी ऍम्ब्युलन्सदेखील चालेल, अशी प्रतिक्रिया तपेंद्र भंडारी यांनी प्रसारमाध्यमांना दिली आहे.