पाचोरा तालुक्यातील खडकदेवळा येथील घटना
पाचोरा (प्रतिनिधी) : तालुक्यातील खडकदेवळा येथील तरुणाचा संशयास्पद मृत्यू झाल्याने त्याचा मृतदेह जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल करण्यात आला होता. दरम्यान, पाचोरा पोलीस स्टेशनला रात्री उशिरापर्यंत काही नोंद नव्हते.
योगेश शिवाजी गायकवाड (वय ३०, खडकदेवळा ता. पाचोरा) असे मयत तरुणाचे नाव आहे. तो खडकदेवळा गावात आई-वडील, पत्नी, एक मुलगा, भाऊ यांच्यासह राहत होता. हातमजुरी करून तो कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होता.(केसीएन) शुक्रवारी दि. १६ रोजी संध्याकाळी ७ वाजेपासून तो घराबाहेर गेला होता. कुटुंबीयांनी शोधाशोध केली. नंतर योगेश हा खडकदेवळा गावातील शेत शिवारात मृत अवस्थेत आढळून आला.
त्याला वीज तारांचा शॉक लागल्याचे व त्यातच योगेश मृत्युमुखी पडला असे प्राथमिक दिसून आले आहे. मात्र त्याच्या तोंडाला फेस येत होता. तसेच, मारहाणीच्यादेखील खुणा आहेत. (केसीएन)त्यामुळे नातेवाईकांनी मृत्यूवर संशय व्यक्त केला आहे. त्याकरिता योगेश गायकवाड याचा मृतदेह हा जळगाव शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथे नेण्यात आला होता. शवविच्छेदन अहवालानंतर योगेशच्या मृत्यूचे खरे कारण कळणार आहे. दरम्यान, पाचोरा पोलीस स्टेशनला रात्री उशिरापर्यंत काही नोंद नव्हते.