भुसावळ (प्रतिनिधी) – तालुक्यातील ओझरखेडा येथील धरणाच्या पायथ्याशी सुरू असलेल्या बनावट देशी दारू निर्मितीचा कारखाना भुसावळ राज्य उत्पादन शुल्क विभागाने गुरूवारी १५ फेब्रुवारी रात्री ११ वाजता छापा टाकला आहे. यात सुमारे ५० लाखांचे मुद्देमाल जप्त करण्यात आले.
भुसावळ तालुक्यातील ओझरखेडा येथील शेतात कारखाना टाकून बनावट देशी दारूची निर्मीती होत असल्याची गोपनिय माहिती भुसावळ राज्य उत्पादन शुल्क विभागाला मिळाली. त्यानुसार पथकाने गुरूवारी १५ फेब्रुवारी रोजी रात्री ११ वाजता पथकासह ओझरखेडा येथील बनावट दारू निमिर्ती करणाऱ्या कारखान्यावर छापा टाकला. याठिकाणी पथकाला तब्बल मोठ्या प्रमाणावर बनावट दारूचा साठा हाती लागला. यावेळी पोलीसांना पाहून कारखान्यातील कर्मचारी पसार झाले आहे. दरम्यान पथकाने बनावट देशी दारूसह बाटल्यांना लावायचे बूच, बाटल्या, स्वयंचलित मशिनरी असे सुमारे ५० लाखांचे साहित्य जप्त करण्यात आले.
ही कारवाई विभागीय निरीक्षक सुजित कपाटे, दुय्यम निरीक्षक राजेश सोनार, राजकिरण सोनवणे, एएसआय आय.बी.बाविस्कर, जवान सागर देशमुख, नितीन पाटील, योगेश राठोड, नंदू नन्नवरे यांच्या पथकाने केली आहे. या बनावट देशी दारूच्या कारखान्यातून अनेक जिल्ह्यांमध्ये बनावट देशी दारू पाठवला जात असल्याचा संशय हा व्यक्त केला जात आहे.