नवी दिल्ली (वृत्तसंस्था ) ;- दरवर्षी मोठ्या धुमधडाक्यात होणारा ऑक्सर पुरस्कार प्रदान सोहळा यंदा कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे ऑनलाईन घेण्यात आला. या पुरस्कार प्रदान सोहळ्यात 2021 मधील ‘नोमेडलँड’या चित्रपटाला यंदाचा ऑस्कर जाहीर झाला आहे. त्याचबरोबर तो यंदाचा सर्वोत्कृष्ट सिनेमा ठरला आहे. 2021 च्या ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात अभिनेता इरफान आणि अभिनेता भानु अथैया यांच्या आठवणींना उजाळा देण्यात आला.
‘नोमेडलँड’ या सिनेमाने 2021 च्या सर्वोत्कृष्ट सिनेमाच्या पुरस्कारावर नाव कोरलं आहे. नोकरी गेल्यानंतर घराबाहेर पडून फिरायला निघालेल्या एका महिलेची कथा या सिनेमात दाखवण्यात आली आहे. फ्रान्सिस मॅकडॉर्मंड हिने या सिनेमात या महिलेची मुख्य भूमिका साकारली आहे. या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट सिनेमा, सर्वोत्कृष्ट अभिनेत्री, सर्वोत्कृष्ट दिग्दर्शिका अशा एकूण सहा श्रेणीत नामांकन मिळालं आहे. ‘नोमेडलँड’ या सिनेमाच्या दिग्दर्शिका क्लोई जाओ यांना सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.
अभिनेते अँथनी हॉपकिंस यांना ‘द फादर’ या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला आहे. अभिनेत्री फ्रान्सेस मॅकडॉर्मंडने ‘नोमाडलँड’ या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार पटकावला आहे. ‘जुडास अॅण्ड द ब्लॅक मसीहा’ या चित्रपटातील ‘फाइट फॉर यू’ या गाण्याला ऑस्कर प्रदान करण्यात आला आहे. अभिनेता टायलर पेरी यांला 2021 सालातील ह्युम्यानिटेरियन पुरस्कार प्राप्त झाला आहे.
‘सोल’ या चित्रपटाला ओरिजनल स्कोअर पुरस्कार मिळाला आहे. यंदाच्या ऑस्करमध्ये या चित्रपटाला मिळालेला दुसरा पुरस्कार आहे. फिल्म् एडिटिंगसाठी ‘साऊंड ऑफ मेटल’ या सिनेमाला पुरस्कार मिळाला आहे. मिकल इ.जी निलसन यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. दक्षिण कोरियाच्या अभिनेत्री युन यू जंग यांना ‘मिनारी’ या सिनेमासाठी सहाय्यक अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला आहे. ‘इफ एनीथिंग हॅपन्स आय लव्ह यू’ या सिनेमाने बेस्ट अॅनिमेटेड शॉर्ट फिल्मचा पुरस्कार पटकावला आहे.