एरंडोल येथून झाली होती चोरी
जळगाव (प्रतिनिधी) :- एरंडोल पोलीस ठाण्याच्या हद्दीतून ओमनी कार चोरी झाल्याची घटना घडली होती. ही कार वाहतूक सेवा करणाऱ्या व्यक्तींनी चोरल्याची माहिती मिळताच अजिंठा चौफुली परिसरातून दोघांच्या मुसक्या आवळण्यात स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाला यश् आले आहे.
चंद्रकांत गोरख चौधरी (वय – २७) व त्याचा साथीदार विशाल लक्ष्मण माळी (वय – २५, दोघ रा. अयोध्यानगर) असे अटक केलेल्या संशयित आरोपींची नावे आहे. त्यांच्याकडून चोरीची कार जप्त करण्यात आली आहे. एरंडोल पोलीस ठाण्याच्या हद्दीतून ओमनी कार चोरी झाल्याची घटना घडली होती. याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर यातील चोरट्याना अटक करण्याच्या सूचना एलसीबीला देण्यात आल्या होत्या. कार चोरी करणारे चोरटे हे अजिंठा चौफुली परिसरात कालीपीली चालवित असल्याची माहिती एलसीबीचे पोलीस निरीक्षकांना मिळाली. त्यांनी पथकाला संशयितांना ताब्यात घेण्याच्या सूचना दिल्या.
त्यानुसार पथकाने अजिंठा चौफुलीवरुन चंद्रकांत उर्फ गड्या चौधरी व विशाल माळी यांना अटक केली. त्यांची चौकशी केली असता, त्यांनी गुन्ह्याची कबुली देत चोरलेली कार काढून दिली. त्यांना पुढील कार्यवाहीसाठी एरंडोल पोलिसांच्या स्वाधीन केले आहे. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किसन नजन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल मोरे, पोलीस उपनिरीक्षक गणेश वाघमारे, पोहेकॉ सुनिल दामोदरे, गोरख बागुल, हेमंत पाटील, ईश्वर पाटील, महेश सोमवंशी यांच्या पथकाने केली.