मुंबई ( प्रतिनिधी ) – दोन दिवसांपासून चर्चा सुरू असलेल्या संतोष परब मारहाण गुन्ह्यात नितेश राणेंना अटकपूर्ण जामीन फेटाळण्यात आला आहे. त्यामुळे नितेश राणेंवर अटकेची टांगती तलवार अद्याप कायम आहे.
या सुनावणीदरम्यान नितेश राणे चौकशीमध्ये सहकार्य करत नसल्याचा दावा फिर्यादींच्या वकिलांनी केला होता. मात्र, आमदार नितेश राणे यांनी तपासात पूर्ण सहकार्य केल्याचा दावा त्यांच्या वकिलांनी न्यायालयात केला. या वरून काही दिवसांपासून राज्यात जोरदार राजकीय कलगीतुरा रंगताना पाहायला मिळाला आहे.
शिवसेनेचे स्थानिक कार्यकर्ते संतोष परब यांना काही दिवसांपूर्वी मारहाण झाल्याचं समोर आलं होतं. त्यांनी नितेश राणे यांच्याविरोधात तक्रार दाखल केली होती. १८ डिसेंबररोजी ही घटना घडल्यानंतर पोलिसांनी चार जणांना अटक केली आहे. याचे अधिवेशनातदेखील पडसाद उमटले होते. मात्र, पोलिसांनी कारवाई सुरू केल्यापासून भाजपा आमदार नितेश राणे हे नॉट रिचेबल आहे.
सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे अध्यक्ष सतीश सावंत यांचे प्रचारप्रमुख संतोष परब यांच्यावर प्राणघातक हल्ल्यात पोलिसांना चौघांना अटक केली आहे. संतोष परब यांनी हल्लेखोरांनी नितेश राणेंच्या नावाचा उल्लेख केल्याचा आरोप केला आहे. नितेश राणे यांचा ठावठिकाणा शोधण्यासाठी पोलिसांनी थेट केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनाच नोटीस बजावून कणकवली पोलीस स्थानकात बोलावलं होतं. पण कामात व्यस्त असल्याचं सांगत नारायण राणे यांनी हजर राहणं टाळलं.
सिंधुदुर्गात जिल्हा बँकेची निवडणूक काही दिवसांत होऊ घातली आहे. संतोष परब मारहाण प्रकरणाच्या आधी या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातलं राजकारण तापलं होतं. या निवडणुकांसाठी राजकीय नेतेमंडळींनी देखील जोरदार प्रचार सुरू केला असून त्यातच नितेश राणेंचं नाव या मारहाण प्रकरणात आल्यामुळे त्याचा फटका बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे.