नवी दिल्ली (वृत्तसंस्था) – भारतीय बँकिंग व्यवस्था मजबूत आहे. सध्याचा काळ कठीण असला तरी आपण यातून बाहेर पडू. त्यामुळे नागरिकांनी बँकातून ठेवी काढून घेण्याचे काहीएक कारण नाही, असे रिझर्व बँकेचे गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी म्हटले आहे. रिझर्व बँकेने आज शुक्रवारी व्याजदरात 0.75 टक्क्यांची कपात केली आहे. त्याचबरोबर रोख राखीव प्रमाणात एक टक्क्यांची कपात केली आहे. या अभूतपूर्व निर्णयानंतर पत्रकारांशी बोलताना दास म्हणाले की, केंद्र सरकार आणि रिझर्व बँक करोना व्हायरसमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करीत आहेत. त्यामुळे बँकांच्या ग्राहकांनी किंवा ठेवीदारांनी घाबरून जाण्याचे काहीएक कारण नाही. सर्व ठेवीदारांच्या आणि ग्राहकांच्या बँकातील ठेवी सुरक्षित असल्याचे आश्वासन दास यांनी दिले.केंद्र सरकार आणि रिझर्व्ह बँकेचे परिस्थितीवर बारीक लक्ष आहे. यातून बाहेर पडण्यासाठी वेळोवेळी आवश्यक त्या उपाययोजना करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.