मुंबई (वृत्तसंस्था) – राज्यात कोरोना ग्रस्तांची वाढत असलेली संख्या पाहता खबरदारी घेतली जात आहे. लोकांनी रस्त्यावर गर्दी करु नये, गर्दीच्या ठिकाणी जाऊ नये असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे. नागरिकांमध्येही भीतीचे वातावरण असल्यामुळे त्यांचेही चांगले सहकार्य मिळत आहे. लोक प्रवास करणे टाळत आहे. तसेच अनेक कंपन्यांमध्ये वर्क फ्रॉम होम लागू करण्यात आले आहे. घरातूनच ऑफिसचे काम केले जात आहे.
राज्यातील कोरोना ग्रस्तांची संख्या झपाट्याने वाढत आहे. मुंबई आणि उल्हासनगरमध्ये कोरोनाचे आणखी दोन रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या 47 झाली आहे. या दोन्ही कोरोना रुग्णांना विलगीकरण कक्षामध्ये ठेवण्यात आले आहे. मुंबई आणि उल्हासनगरमध्ये प्रत्येकी 1 रुग्ण आढळला, 22 वर्षीय मुलगी आणि 47 वर्षीय महिलेचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत.
यासोबतच करोनाचा प्रसार रोखण्यासाठी आंतरराष्ट्रीय विमानतळावर आरोग्य मंत्रालयाने स्क्रीनिंग केली जात आहे. संशयित रुग्णांना 14 दिवसांसाठी स्वतःच्याच घरात वेगळं राहण्याचा सल्ला दिला जात आहे. डिसेंबरमध्ये हा व्हायरस पसरण्यास सुरुवात झाली होती. तेव्हापासून देशातील विमानतळावर आतापर्यंत 14 लाख प्रवाशांची चाचणी करण्यात आली आहे.