मुंबई (वृत्तसंस्था) – प्रत्येक स्थरावर शासकीय यंत्रणा काम करत आहे. तर मीरा भाईंदर महानगरपालिकेचे आयुक्त चंद्रकांत डांगे यांनी मीरा भाईंदर मधील सर्व धर्माच्या धर्मगुरू यांच्यासोबत एक बैठक घेऊन विनंती केली की आपण प्रार्थना करण्यासाठी एकत्र येऊ नका पुढील काही दिवस घरीच प्रार्थना करा.
संपूर्ण जगात हाहाकार माजवणाऱ्या कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी देशासह राज्यात सर्व शासकीय यंत्रणा काम करत आहेत. त्याचप्रमाणे मिरा भाईंदर महानगरपालिका खबरदारीचा उपाय म्हणून शहरातील मशीद मंदिर चर्च अनिश्चित कालावधीसाठी बंद ठेवण्याचा निर्णय आयुक्त चंद्रकांत डांगे यांनी घेतला.
या बैठकमध्ये मंदिर, मशीद, चर्च तसेच इतर धर्मियांचे धर्मगुरू सहभागी झाले होते. आयुक्त चंद्रकांत डांगे यांनी सर्व धर्मगुरुंकडे धार्मिकस्थळे बंद ठेवण्याची विनंती केली. धर्मगुरु यांनी आयुक्तच्या विनंतीला मान देऊन धर्मस्थळ बंद करण्याचा निर्णय घेतला. तसेच सर्व धर्मगुरूंनी आपल्या समाजातील जनतेला घरी पूजाअर्चना, प्रार्थना किंवा नमाज अदा करण्याचे आव्हान केले आहे. त्यामुळे काही दिवस मिरा भाईंदर शहरात कोरोनामुळे गर्दी टाळण्यासाठी सर्व धार्मिक स्थळ बंद राहणार आहे.