अमळनेर (प्रतिनिधी) – कृ उ बाजार समितीत धान्य विक्रीसाठी १८०० वाहने जिल्ह्याातील विविध गावांमधून आलेली होती. यातून सुमारे ३० हजार क्विंटलची विक्रमी आवक झाली, आजची ही आवक पन्नास वर्षातील विक्रमी आवक आहे.
पहाटे साडेपाचपासून बाजार समितीबाहेर दोन कि.मी.ची रांग थेट पैलाड भागापर्यंत लागली होती, तर बालेमिया ते सुभाष चौक वेगळी रांग लावण्यात आली. सकाळी लवकर नऊपासून टप्प्याटप्प्याने ५० वाहनांचा लिलाव करण्यात आला व मोजणी व्यापारी, कर्मचारी यांनी नियमांचे पालन केल्याने खरेदी सुरळीत झाली.अमळनेर बाजार समितीत कटती बंद केली व रोखीने पेमेंट मिळते म्हणून जळगाव, धुळे व नंदुरबार जिल्ह्यातील विविध तालुक्यातून शेतकऱ्यांनी गहू , दादर, हरभरा, मका, बाजरी विक्रीस आणली होती.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सोशल डिस्टंसिंगचे नियम पाळण्यात आले. रस्त्यावर प्रचंड गर्दी झाल्याने सकाळी सातपासून सभापती प्रफुल पाटील, विश्वास पाटील, भगवान कोळी, हरी वाणी, शंकर बितराई व इतर स्वत: गेटवर थांबून एका वाहनासोबत चालकाव्यतिरिक्त एकाच शेतकºयाला प्रवेश देत होते. गर्दी करणाऱ्यांना हटकत होते. बाजार समिती आवार फुल झाल्यानंतर वाहने टोकन देऊन शेतकी संघ जिनमध्ये उभे राहण्यासाठी सोय करण्यात आली व आवारात विविध ठिकाणी हात धुवायला साबण व पाण्याच्या बादल्या, सॅनिटायझर उपलब्ध होते. कोरोनाची भीती आणि लॉकडाऊननंतरदेखील ३० हजार क्विंटल मालाची आवक झाली. गव्हाला कमाल रुपये २,०५६, हरभºयाला कमाल ३,८५०, दादरला कमाल ४,०००, मक्याला कमाल १,४२१ व बाजरीला रुपये कमाल २,३५१ रुपये प्रतिक्विंटल भाव मिळाला. अनेक वाहनांसोबत तीन ते चार व्यक्ती आल्याने दोघांव्यतिरिक्त इतरांना बाजार समितीत प्रवेश नाकारण्यात आला. बाहेरून आलेल्या या व्यक्ती गावात फिरत होत्या. बाजार समितीत कोरोनासंदर्भात योग्य ती काळजी घेतली जात होती. मात्र आलेल्या जादा लोकांवर बाहेर नियंत्रण ठेवता येणे शक्य नसल्याने कोरोनाची भीती कायम आहे. शेतकऱ्यांनी वाहनाबरोबर चालकासोबत एकट्याने यावे, असे आवाहन बाजार समितीतर्फे करण्यात आले.