मुंबई (वृत्तसंस्था) – सांगली जनधन खात्यावर जमा झालेले पैसे काढण्यासाठी मिरजेतील स्टेट बॅंकेबाहेर मंगळवारी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. यावेळी कोणत्याही प्रकारचे सामाजिक अंतर पाळले जात नसल्याचे आढळून आले.जनधन खात्यावर जमा झालेले पैसे काढण्यासाठी नागरिकांना मंगळवारी बोलाविण्यात आले होते. परंतु, नागरिकांची पैसे काढण्यासाठी एकदम गर्दी झाली. बॅंकेच्यावतीने योग्य ती खबरदारी घेण्यात आली होती. बॅंकेने गेट बंद करून सर्व नागरिकांना रस्त्यावर उभे राहण्याच्या सूचना दिल्या होत्या. पैसे काढण्यासाठी एकेकाला बॅंकेत सोडण्यात येत होते. परंतु, रांगेत थांबलेल्या नागरिकांकडून सामाजिक अंतराचे नियम पाळले जात नसल्याचे दिसून आले. नागरिकांची बॅंकेबाहेर गर्दी झाल्याने रांगा लावण्यात आल्या होत्या. बॅंकेच्या अधिकाऱ्यांकडून अंतर राखण्याच्या सूचना देण्यात येत होत्या. परंतु, नागरिकांकडून मात्र या नियमांचे पालन होत नव्हते. दरम्यान, पोलिसांनी मध्यस्थी करून नागरिकांना सामाजिक अंतर ठेवण्याच्या सूचना दिल्या.