नवी दिल्ली (वृत्तसंस्था) – हायड्राक्सीक्लोरोक्वीन या औषधांचा पुरवठा शेजारील देशांना करणे गरजेचे आहे. कारण हे देश भारताच्या क्षमतेवर अवलंबून आहेत, पण करोनाचा मोठा फटका बसलेल्या देशांनाही आम्ही या औषधांचा पुरवठा करू अशी भूमिका आता भारताने घेतली आहे. भारताने अमेरिकेला ही औषधे पुरवली नाहीत तर त्याचे भारताला प्रत्युत्तर दिले जाईल अशी धमकी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिली होती. त्या पार्श्वभूमीवर बोलताना भारताच्या विदेश व्यवहार मंत्रालयाने ही भूमिका स्पष्ट केली आहे. तथापि अमेरिकेची गरज पुरवली जाईल किंवा कसे यावर भारतानेही थेट भाष्य केलेले नाही. हे औषध तयार करण्यासाठी वापरले जाणारे 26 पदार्थ आणि प्रत्यक्ष हे औषध निर्यात करण्यास भारताने गेल्या 25 मार्चपासून बंदी लागू केली आहे.विदेश व्यवहार विभागाचे प्रवक्ते अनुराग श्रीवास्तव यांनी आज येथे सांगितले की, करोनाचा वाढता प्रसार लक्षात घेऊन भारताने आपल्या शेजारील देशांना योग्य प्रमाणात ही औषधे निर्यात करण्याचा निर्णय घेतला आहे, त्या खेरीज अन्य ज्या देशांना याचा मोठा फटका बसला आहे त्यांनाही ही औषधे निर्यात केली जातील असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.करोनाच्या पार्श्वभूमीवर आंतरराष्ट्रीय समुदायाने सहकार्य भावनेने काम करावे अशीच भारताची भूमिका राहिली आहे असेही त्यांनी म्हटले आहे. या औषधांची भारतातील गरज आणि उपलब्ध साठा याचा विचार करूनच निर्यातीला अनुमती दिली जाईल असेही श्रीवास्तव यांनी सांगितले. भारतातील या औषधांच्या उपलब्ध साठ्यावर आणि त्याच्या उत्पादनावर सरकार लक्ष ठेऊन आहे असेही ते म्हणाले.