मुंबई (वृत्तसंस्था) – कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर सातारा जिल्हा मध्यवर्ती कारागृहातील (जेल) बंदीवान सोडण्याचा निर्णय झाला आहे. त्यानुसार 27 बंदीवानांना सोडण्यात आले आहे. गंभीर गुन्ह्यातील बंदीवानांना यातून वगळण्यात आले. त्या बंदीवानांना 30 ते 45 दिवसांच्या तात्पुरत्या जामीनावर सोडण्यात आले आहे. दरम्यान, बंदीवानांमध्ये 26 पुरुष व एका महिलेचा समावेश आहे.कोरोना संसर्गाने जगात थैमान घातले आहे. भारतालाही त्याचा मोठा फटका बसला आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये, यासाठी देशात लॉकडाऊन करण्यात आले. या पार्श्वभूमीवर सातारा कारागृहात असणार्या बंदीवानांना सोडण्याचा निर्णय उच्चस्तरावरुन झाला. त्यानुसार कारागृहात क्षमतेपेक्षा अधिक असलेल्या कैद्यांना तातडीने पॅरोल आणि तात्पुरत्या जामीनावर सोडावे, असे आदेश न्यायालयाने दिले.