अमळनेर तालुक्यातील कळमसरा येथील घटना
अमळनेर (प्रतिनिधी) : तालुक्यातील कळमसरे येथील शारदा माध्यमिक विद्यालयाच्या इयत्ता नववीतला विद्यार्थी हा शाळेत संध्याकाळी साडेचारच्या सुमारास चक्कर येऊन पडल्याने त्याला दवाखान्यात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते तेथे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याला मयत घोषित केल्यामुळे कळमसरा गावात शोककळा पसरली आहे.
घनश्याम जितेंद्र महाजन ( वय १५, रा. कळमसरा, ता. अमळनेर) असे मयत विद्यार्थ्याचे नाव आहे. तो गावात आई-वडिलांसह तसेच आजी आजोबा व बहिणींसह राहत होता. एकुलता एक मुलगा असल्याने वडिलांच्या शेती कामात तो हातभार लावत होता. कळमसरे येथील शारदा माध्यमिक विद्यालयात तो इयत्ता नववीत शिकत होता. शुक्रवारी दिनांक १२ जुलै रोजी वर्गातील विद्यार्थी संध्याकाळी शाळेच्या पटांगणात खेळत असताना अचानक घनशामला चक्कर आली अन तो खाली पडला. त्यावेळेस शिक्षकांनी त्याला सावरले.
त्याला सुरुवातीला खाजगी दवाखान्यात व त्यानंतर अमळनेर ग्रामीण रुग्णालयात पाठवले. तेथे वैद्यकीय अधिकारी यांनी तपासून मृत घोषित केले. यावेळी कुटुंबीयांनी एकच आक्रोश केला. घनश्याम हा अत्यंत नम्र व हुशार असलेला गुणी विद्यार्थी क्रीडा, नाटक सांस्कृतिक कार्यक्रम इत्यादी सर्व कार्यक्रमात भाग घेणारा होता.(केसीएन)श्यामच्या अचानक जाण्याने संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे. अमळनेर ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन होऊन मारवड पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.