मुंबई (वृत्तसंस्था) – कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कलम १४४ लागू केले आहे. तसेच राज्य लॉकडाऊन केले आहे. मात्र सरकारच्या या निर्णयाला काही ठिकाणी गंभीरपणे घेण्यात येत नसल्याचे चित्र आज सकाळपासून पाहायला मिळत आहे. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी सुद्धा जनतेला घराबाहेर न पडण्याचं आवाहन केलं आहे.
कोरोनाच्या महाभयंकर संकटातून बाहेर पडण्यासाठी सामूहिक व व्यक्तिगत पातळीवर आपण एकजुटीने कारवाई करण्याची आवश्यकता आहे. @PMOIndia यांनी आपले दैनंदिन व्यवहार थांबवण्याच्या आवाहनाला देशातल्या कानाकोपऱ्यातील लोकांनी प्रतिसाद दिला त्यासाठी आपण सगळेजण धन्यवादाला पात्र आहोत.
‘बंधू भगिनींनो कोरोनाचा वाढता प्रभाव लक्षात घेता राज्य सरकार आणि केंद्र सरकारनं काही निर्णय घेतले आहेत. त्या निर्णयांची अतिशय गांभीर्यानं नोंद घेऊन कृती करण्याची आवश्यकता आहे. राज्यात जमावबंदीचा आदेश झालेला आहे. तरीही अनेक ठिकाणी रस्त्यावर लोकांच्या घोळकेच्या घोळके बघायला मिळत आहेत. इतर देशातील परिस्थिती गंभीर झालेली आहे. त्याची गांभीर्यानं नोंद घेऊन वेळीच जी दक्षता घ्यायची आहे, ती त्यांनी घेतलेली आहे. आपणही अशा प्रकारची गांभीर्यानं दक्षता घेण्याची आवश्यकता आहे, असंही ते म्हणाले आहेत.शरद पवार पुढे म्हणाले, ‘महाराष्ट्रात कोरोनाग्रस्तांची संख्या वाढत चाललेली आहे. त्यामुळे शासकीय यंत्रणा आणि पोलिसांना पूर्णतः सहकार्य करावं. कोरोनाविरुद्धची लढाई आपण जिंकणारच आहोत. संयम, समंजसपणा आणि योग्य दक्षता घेण्याची गरज आहे. मला विश्वास आहे की आपण याची अतिशय गांभीर्यानं नोंद घ्याल.’