नवी दिल्ली (वृत्तसंस्था) – कोरोनाचा एकही रूग्ण नसलेल्या लातूरात शनिवारी एकाच दिवसात आठ जणांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आल्याने मोठी खळबळ उडाली आहे. हरियाणा राज्यातील नुह जिल्ह्यातील फिरोजपूर झिरका येथे गेल्या तीन महिन्यांपासून धार्मिक कार्यासाठी वास्तव्यास असलेले 12 यात्रेकरू दोन एप्रिलच्या मध्यरात्री लातूर जिल्ह्यातील निलंगा येथील मशिदीत आढळून आले होते. या 13 जणांचे स्वॅब तपासणीसाठी पुणे येथील प्रयोगशाळेत पाठवण्यात होते. त्यातील आठ जण कोरोना पॉझिटिव्ह असल्याचा अहवाल प्राप्त झाला आहे. या कोवीड 19 पॉझिटिव्ह रुग्णांवर लातूर येथील विलासराव देशमुख शासकीय विज्ञान संस्थेच्या महाविद्यालयाच्या रुग्णालयात उपचार करण्यात येत असून त्यांची प्रकृती स्थिर आहे. कोरोना विषाणूचा प्रार्दुभाव रोखण्यासाठी देशात लॉकडाऊन करण्यात आले असताना ही या राज्यातून त्या राज्यात जाणाऱ्या लोकांचा प्रवास थांबताना दिसत नाही. त्यामुळे या आजार ही शहरातून गावाकडे जाताना दिसतोय. कोरोनाची बाधा झालेले परदेश किंवा देशातील मोठ्या शहरातून गावाकडे आल्याची माहिती समोर आली आहे. लातूरमध्ये आलेल्या 12 मुस्लीम यात्रेकरुंपैकी आठ जणांना कोरोना व्हायरसची लागण झाल्याचे उघड झाले आहे. या आठ जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून अन्य चार जणांना विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले आहे. या सर्व यात्रेकरूंवर तसेच विलगीकरण केंद्रात ठेवण्यात आलेल्या यात्रेकरूंवर उपचार करताना पुरेशी काळजी घेण्यात यावी आणि कोणत्याही परिस्थितीत याची कुणालाही लागण होणार नाही याबाबत दक्षता घेण्याचे आणि या सर्वांवर उपचार करून लॉकडाऊननंतर त्यांच्या मूळ गावी पाठविण्याचे निर्देश पालकमंत्री अमित देशमुख यांनी संबंधित यंत्रणेला दिले आहेत. हे सर्व यात्रेकरू निलंगा येथील ज्या मशिदीत आढळले होते. तेथे ते कोणाच्या संपर्कात आले. त्याचप्रमाणे त्यांच्या हरियाणा ते लातूर पर्यंतच्या प्रवासात कुठे आणि कुणाकुणाच्या संपर्कात आले, याचा शोध घेण्याचे काम राज्य सरकारतर्फे सुरू आहे. अशी माहितीही पालकमंत्र्यांनी दिली आहे.