जळगाव (प्रतिनिधी) : तालुक्यातील खेडी खुर्द येथील तरुणाचा मध्यरात्री छतावरून खाली पडल्याने जागीच मृत्यू झाल्याची घटना बुधवारी सकाळी घडली आहे. जळगाव तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
अंकुश ज्ञानेश्वर चौधरी (वय-२५) रा. खेडी खुर्द ता. जळगाव असे मृत तरूणाचे नाव आहे. खेडी खुर्द गावात अंकुश चौधरी हा आई, वडील, भाऊ यांच्यासोबत शेती करून आपला उदरनिर्वाह करीत होता. मंगळवारी २८ फेब्रुवारी रोजी जेवण करून घराच्या गच्चीवर झोपला होता. बुधवारी १ मार्च रोजी सकाळी ७ वाजता त्याची आजी गोपाबाई चौधरी ह्या नातवाला उठविण्यासाठी गेल्या असता अंकुश हा छतावरून खाली पडून मयत स्थितीत दिसून आला. नातवाचा मृतदेह पाहून आजीने आरडाओरड केली. नेमका छतावरून अंकुश कसा पडला हे कुणालाच समजले नाही.
या घटनेबाबत जळगाव तालुका पोलीसांनी घटनास्थळी धाव घेवून पंचनामा केला. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. मयत अंकुशच्या पश्चात आई सुनिता, भाऊ भावेश, वडील ज्ञानेश्वर विठ्ठल चौधरी, आजी गोपाबाई असा परिवार आहे. या घटनेबाबत जळगाव तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोहेकॉ विश्वनाथ गायकवाड करीत आहे.