भुसावळ तालुक्यातील वरणगाव येथील घटना, मुख्याधिकाऱ्यांनी दिले आश्वासन
भुसावळ (प्रतिनिधी) – वरणगाव नगरपरिषद स्थलांतर विरोधी कृती समितीतर्फे नगर परिषदचे मुख्याधिकारी समीर शेख यांना निवेदन देऊन ११ जुलै रोजी महामोर्चा काढण्यात येणार आहे. यावेळी आपण स्वतः उपस्थित राहून निवेदन स्वीकारावे असे कृती समितीच्या वतीने सांगण्यात आले होते. परंतु आज मंगळवार ११ जुलै रोजी वरणगाव शहरातून महामोर्चा नगरपरिषद येथे आल्यानंतर मुख्याधिकारी कार्यालयात नसल्याने कृती समितीचे सदस्यांनी आणि गावकऱ्यांनी संतप्त होऊन दोन तास ठिय्या आंदोलन केले. जोपर्यंत मुख्याधिकारी येथे येत नाही तोपर्यंत आम्ही इथून उठणार नाही असा पवित्रा कृती समितीने घेतला. महामोर्चातील नागरिकांच्या संतप्त भावना लक्षात घेऊन एपीआय अडसूळ आणि ओएस सूर्यवंशी यांनी मुख्याधिकाऱ्यांना ही बाब लक्षात आणून दिली..त्यानंतर मुख्याधिकाऱ्यांनी फोनद्वारे कृती समितीचे सदस्यांसोबत प्रांत यांच्यासोबत तुमची बैठकीचे आश्वासन दिल्यानंतर ठिय्या आंदोलन मागे घेऊन कृती समितीतर्फे ओ. एस, पंकज सूर्यवंशी यांना निवेदन देण्यात आले.
वरणगाव नगरपरिषद स्थलांतर विरोधी कृती समितीतर्फे महामोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. सकाळी भोगावती नदी पात्र येथील ग्रामदैवत रेणुका माता मंदिरात रेणुका मातेला पुष्पहार अर्पण करून महामोर्चाला सुरुवात करण्यात आली. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आला. या महामोर्चात वरणगाव शहरातील विविध राजकीय पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते, तरुण युवक, सामाजिक संघटनेचे अध्यक्ष, विविध समाजाचे अध्यक्ष, गणेश मंडळ, दुर्गा मंडळ यांचे अध्यक्ष, महीला, बाजाराचा दिवस असल्यावरही व्यापारी मोठ्या संख्येने या महामोर्चात सहभागी झाले होते. नगरपरिषद स्थलांतर विरोधी भव्य महामोर्चात हजारोने नागरिक सहभागी झाले होते.
महामोर्चात “जोर जुलूम की टक्कर मे, संघर्ष हमारा नारा है, “नगरपरिषद गावात राहिलीच पाहिजे, राहिलीच पाहिजे”, “व्यापारी संकुल बांधून नगरपरिषद ठीकडे नेणाऱ्या प्रशासनाचा निषेध” “नो सपोर्ट, नो व्होट”, अशा विविध प्रकारच्या घोषणा देण्यात आल्या. महामोर्चा नगरपरिषद मध्ये आल्यानंतर मुख्याधिकारी बैठकीसाठी जळगावला असल्याचे सांगण्यात आले. यानंतर कृती समिती सदस्यांनी आणि गावकऱ्यांनी संतप्त होऊन मुख्याधिकारी जोपर्यंत येथे येत नाही तोपर्यंत आम्ही इथून उठणार नाही, अशी आक्रमक भूमिका घेत दोन तास ठिय्या आंदोलन केले. शेवटी कायदा सूव्यवस्था बिघडू नये म्हणून वरणगाव पोलीस स्टेशनचे एपीआय आशिषकुमार अडसूळ यांनी जिल्हाधिकारी आणि मुख्याधिकारी यांना ही माहिती कळवली. त्यानंतर मुख्याधिकारी यांनी कृती समितीच्या सदस्यांसोबत उद्या प्रांत अधिकारी त्यांच्यासोबत बैठक लावण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर संतप्त झालेले कृती समिती सदस्य आणि गावकरी यांनी ठिय्या आंदोलन मागे घेऊन ओएस पंकज सूर्यवंशी, एपीआय अडसूळ यांना कृती समितीतर्फे निवेदन दिले.
महामोर्चात कृती समिती अध्यक्ष आशिष चौधरी, उपाध्यक्ष अश्फाक काझी, सचिव महेश सोनवणे, सहसचिव संतोष माळी, भास्कर गवळी, शशिकांत चौधरी, चंद्रकांत शर्मा, अतुल झाबरे, अजय पाटील, मनोज कोलते, सुनील भोई, संजीव कोळी, संदीप वाघ, अजय सोनार, किरण माळी, सुनील डोयसे यांच्यासह गावातील विविध राजकीय पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते, समाजाचे अध्यक्ष, व्यापारी बंधू, युवक तरुण मोठ्या संख्येने सहभागी होते. वरणगाव पोलीस स्टेशनचे एपीआय आशिषकुमार अडसूळ, परशुराम दळवी, किशोर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली मोठया पोलिस बंदोबस्तात महामोर्चा शांततेत पार पडला.