जळगाव (प्रतिनिधी) – महापालिकेच्या आगामी आर्थिक वर्षांसाठी तयार करण्यात आलेल्या 1291 कोटींच्या अंदाजपत्रकाला शुक्रवारी सर्वानुमते मंजुरी देण्यात आली. प्रशासनाच्या अंदाजपत्रकात उत्पन्न वाढीसोबतच विकास कामांसाठी बदल सुचवून स्थायी समितीने 154 कोटींची वाढ केली. यंदा कोणतीही करवाढ करण्यात आलेली नाही. तसेच मुंबईच्या धर्तीवर प्रभाग समिती कार्यालयांच्या अधिकारात वाढ करून मिनी महापालिकेचा दर्जा देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय विशेष सभेत घेण्यात आला.
मनपाच्या 2019-20 चे सुधारित व 2020-21 चे मूळ अंदाजपत्रकाला मंजुरी देण्यासाठी स्थायी समिती सभापती अॅड.सुचिता हाडा यांच्या अध्यक्षतेखाली विशेष सभा आयोजित करण्यात आली होती. सभापती अॅड. हाडा यांनी प्रशासनाने सादर केलेल्या अंदाजपत्रकातील काही त्रुटी व बदल सभागृहासमोर मांडले. तसेच प्रशासनाने मालमत्तांचे सर्वेक्षण पूर्ण झाल्याने सुनावणी घेऊन बिले अदा केल्यास मालमत्ता कर 53 कोटींवरून 80 कोटी वसूल करण्याचे टार्गेट दिले. पिंप्राळय़ात मनपाचे अद्ययावत रुग्णालय नाही. वाढलेली लोकसंख्या लक्षात घेता सोमाणी मार्पेटच्या पहिल्या मजल्यावर महापालिकेचे सुसज्ज रुग्णालय निर्माण करण्याचा निर्णय घेण्यात आला. प्रभाग समिती कार्यालय व पालिकेचे रुग्णालय आदी इमारतींसाठी 25 कोटी रुपयांनी तरतूद वाढवण्यात आली आहे.
मनपाच्या प्रभाग समिती कार्यालय आणखी सक्षम करण्याची घोषणा झाली. या कार्यालयाचे रूपांतर मिनी महापालिकेत करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. यात खुला भूखंड विभाग प्रभाग समितीनिहाय विभागणी करून विकेंद्रीकरण करण्यात येणार आहे. तसेच बांधकाम, आरोग्य, स्वच्छता, लाईट, पाणीपुरवठा, घरपट्टी, खुला भूखंड, अग्निशमन, अतिक्रमण आदी सर्व विभाग प्रभाग अधिकाऱयांच्या अधिपत्याखाली करण्यात येणार आहेत.महापालिकेकडून पूर्वी स्मशानभूमीत मोफत लाकडे पुरवणे सुरू होते. मात्र मध्यंतरी लेखापरीक्षणात आक्षेप आल्यामुळे ते बंद पडले. त्यात लवकरच सकारात्मक निर्णय होण्याची शक्यता असल्याचा विश्वास व्यक्त करत सभापती अॅड. हाडा यांनी मोफत दहन व दफन या अंतर्गत तरतूद 1 लाखावरून एक कोटी करण्याची घोषणा केली. फुले, सेंट्रल फुले मार्पेटच्या बऱयाच गाळेधारकांनी गाळे भाडय़ाचा भरणा केला आहे. त्यामुळे त्या मार्पेटच्या नूतनीकरणाचा प्रस्ताव विचाराधीन असल्याचे सभापती म्हणाल्या.