मुंबई (वृत्तसंस्था) – मागील दोन दिवसांपासून राज्यात अवकाळी पाऊस पडत आहे. अशातच यवतमाळमधील राळेगाव तालुक्यातील गुजरी येथे वीज पडून एकाच कुटुंबातील सहा जणांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. राळेगावपासून जवळच असलेल्या गुजरी येथील शिवारात ही घटना आज उघडकीस आली. गुजरी शिवारातील अरुण गोंडे यांच्या शेतात निमगव्हान येथील गायी चारणारे काही दिवसांपासून गायी चाराईसाठी शेतातील शेडमध्ये मुक्कामी होते. काल संध्याकाळी राळेगाव तसेच परिसरात विजेच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस झाला. त्यामुळे रात्री कधीतरी वीज पडून त्यांचा मृत्यू झाला असावा असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. राज्यात अनेक ठिकाणी वादळी पाऊस सुरु आहे. यवतमाळमध्ये देखील काल विजांसह जोरदार पाऊस झाला. याच दरम्यान ही दुर्दैवी घटना घडली. या घटनेत या कुटुंबातील सगळेच सदस्य या घटनेत मृत्युमुखी पडले आहेत. मृतकांमध्ये चार पुरुष आणि दोन महिलांचा समावेश आहे. या घटनेत अभिमान अंबाडरे, मंदा अंबाडरे, लक्ष्मण कोयरे, सुभाष न्याहारे, साहेबराव देवनरे, पिसाबाई देवनरे यांचा मृत्यू झाला आहे. या परिवाराकडे त्यांच्या 50 गायी असून एकही गाय या घटनेत दगावली नाही