इंदोर (वृत्तसंस्था) – कोरोनाची तपासणी सुरु असताना आरोग्य विभागाच्या पथकाला स्थानिकांच्या रोषाला सामोरे जावे लागले. संतप्त झालेल्या स्थानिकांनी आरोग्य विभागाच्या पथकावर थेट दगडफेक केली. इंदूरच्या टाट पट्टी बाखल भागात काल दुपारी अडीचच्या सुमारास ही घटना घडली. सुदैवाने आरोग्य विभागाचे पथक थोडक्यात या दगडफेकीतून बचावले. या घटनेमुळे तणाव निर्माण झाल्याने परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी या भागात मोठया प्रमाणावर पोलीस बंदोबस्त तैनात करावा लागला. दगडफेकीच्या या घटनेमध्ये कोणीही जखमी झालेले नाही.दरम्यान, टाट पट्टी बाखल भागात कोरोनाचे दोन रुग्ण सापडल्यामुळे प्रशासनाने हा भाग कोरनाच्या फैलावाचे मुख्य केंद्र म्हणून घोषित केला आहे. इथे राहणार्या 54 कुटुंबांना होम आयसोलेशनमध्ये ठेवण्यात आले आहे.