सिंगापूर (वृत्तसंस्था) – जगभरात कोरोनाचा कहर सुरु आहे. यातून सिंगापूर देखील सुटलेले नाही. मात्र सिंगापूरमध्ये या कोरोनाचा प्रभाव वाढण्याच्या आधी नियंत्रणासाठी काही महत्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. रांगेत किंवा सार्वजनिक ठिकाणी दुसऱ्याच्या तीन फूट जवळ गेलात तर थेट तुरुंगात टाकण्याचा इशारा देण्यात आला आहे. कोरोनाला दूर ठेवण्यासाठीच्या लढ्यात सिंगापूरमध्ये हा नवा कडक नियम लागू करण्यात आला आहे.
मॉलमध्ये किंवा हॉटेलमध्ये किंवा तिकीटाच्या रांगेत तुम्हाला हे सुरक्षित अंतर राखणे गरजेचे आहे. जाणूनबजून या नियमाचे पालन केले नाही, मुद्दाम दुसऱ्याच्या जवळ गेलात तर 5 लाख रुपयांचा दंड किंवा सहा महिन्याचा तुरुंगवास किंवा दोन्ही शिक्षा भोगावी लागू शकते. अर्थात आपण आपल्या कुटुंबासोबत असलो तरी ही शिक्षा लागू असेल का किंवा गर्दीच्या वेळी ट्रेन, बसमध्ये हा नियम कसा पाळणार अशा अनेक शंका, प्रश्न लोकांच्या मनात आहेतच.सिंगापूरमध्ये सर्व व्यवहार सुरळीत आहेत, लॉकडाऊन नाही मात्र येत्या काही काळात योग्य ते उपाय योजले जातील असे संकेत सरकारने दिले आहेत. तिथे सिनेमा हॉल, बार बंद आहेत तसंच मोठ्या इव्हेन्ट्सवर बंदी आहे.आत्ताच्या घडीला सिंगापूरमध्ये कोरोनाचे 732 रुग्ण आहेत तर 2 लोकांनी जीव गमावला आहे. दोन दिवसांपूर्वी रुग्णांच्या संख्येत 3 ची भर पडली होती त्यात ३ वर्षांच्या भारतीय मुलीचा समावेश होता. लोकांनी सोशल डिस्टन्सिंगला गंभीरपणे घेतले नाही तर आगामी काळात अत्यंत कडक नियम आणि ते न पाळणारांना जास्त कडक शिक्षेचा विचार तिथले सरकार करत आहे.