नवी दिल्ली (वृत्तासनस्थ) – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी करोनामुळे देशात निर्माण झालेल्या परिस्थितीवर आणि लॉकडाउनचा कालावधी वाढवून फायदा झाला असल्याचे सांगितले. तसेच नियमांची काटेकोरपणे अमलबजावणी केल्याबद्दल मुख्यमंत्र्यांचेही कौतुक केले. लॉकडाउनसाठी केलेल्या एकत्रित प्रयत्नांचा प्रभाव होत असताना काही प्रमाणात दिसत असून त्याचा फायदा होत असल्याचे नरेंद्र मोदी यांनी यावेळी सांगितले.
लॉकडाउनसंबंधी पुढील धोरण ठरवण्यासाठी बोलावण्यात आलेल्या या बैठकीत बोलताना नरेंद्र मोदींनी म्हटलं की, ‘सर्व मुख्यमंत्र्यांशी माझी वैयक्तिक स्तरावर चर्चा होत असते. पण एकत्रित संवाद साधण्याची ही चौथी वेळ आहे’. बैठकीदरम्यान नऊ राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी आपले म्हणणे मांडत राज्यातील परिस्थितीची माहिती दिली. बैठकीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाहदेखील सहभागी झाले होते. त्यांनीही मुख्यमंत्र्यांशी संवाद साधला. ज्या राज्यांमध्ये लॉकडाउनच्या नियमांचे उल्लंघन केले जात आहे तिथे योग्य ती काळजी घ्यावी असे अमित शाह यांनी यावेळी सांगितले. करोना व्हायरससोबतचं हे युद्ध दीर्घकाळ चालणार असून धीर ठेवला पाहिजे असेही त्यांनी सांगितले.यापूर्वी २० मार्च रोजी पंतप्रधानांनी पहिल्यांदा करोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे चर्चा केली होती. तसेच करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी स्थानिक प्रशासन आणि लोकांमध्ये सहकार्याची भावना वाढवण्याचं आवाहन केले होते . याव्यतिरिक्त त्या बैठकीत करोनाचा सामना करण्यासाठी राज्यांनी कोणत्या उपाययोजना केल्या आहेत, यावर चर्चाही केली होती.