अमळनेर (प्रतिनिधी) – करोना या संसर्गजन्य विषाणूचा प्रसार रोखणेकरीता प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याबाबत आपण प्रथम सर्व नियोजित कार्यक्रम रद्द केल्याचे आमदार अनिल पाटील यांनी महसूल कार्यालयात झालेल्या दक्षता समितीच्या बैठकीत घोषित केले. आमदार अनिल पाटील यांच्या उपस्थितीत महसूल विभागाच्या राजसारथी सभागृहात प्रांताधिकारी सीमा अहिरे तहसीलदार मिलिंद वाघ व सर्व स्वस्त धान्य दुकानदारांची बैठक संपन्न झाली. या बैठकीत आमदार अनिल पाटील यांनी करोना संदर्भात स्वतः आपल्यापासून मी सुरुवात करत असून 31 मार्च पर्यंत होणारे सार्वजनिक कार्यक्रमात आपण जाणे रद्द केले असून नागरिकांनी देखील जाऊ नये. 14 मार्चच्या अधिसूचनेनुसार आंतरराष्ट्रीय स्तरावर व देशांतर्गत करोना या विषाणुचे संसर्ग बाधीत रुग्ण आढळत आहेत. त्यामुळे या विषाणुचा संसर्ग व प्रादुर्भाव पसरण्याची शक्यता लक्षात घेता व अधिक वाढ होऊन देता प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे आवश्यक आहे.जळगाव जिल्ह्यात बाहेरुन येणाऱ्या प्रवाशांमुळे करोना विषाणूचा संसर्ग पसरण्याची शक्यता लक्षात घेता सभा, मेळावे, सामाजिक कार्यक्रम, जत्रा, यात्रा उरुस, धार्मिक व सांस्कृतीक कार्यक्रम, क्रिडास्पर्धा इत्यादी सार्वजनिक कार्यक्रमांना जाऊ नये तसेच परदेशातील येणाऱ्या नागरिकांवर लक्ष ठेवावे अशा सुचना दिल्या.