पुणे (वृत्तसंस्था) – वाघळवाडी, सोमेश्वर कारखान्याच्या ऊसतोडणी कामगारांच्या वसाहतीत आग लागून एक झोपडीसह जनावरांचा चारा जळून खाक झाला. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. ही घटना शनिवारी (दि. 23) सायंकाळी पाच ते सव्वापाचच्या सुमारास घडली.
याबाबतची माहिती अशी की, कारखाना कार्यक्षेत्रातील ऊसतोडणी कामगारांच्या मोकळ्या वसाहतीमधील पाचटाला सायंकाळी अचानक आग लागली. त्याचवेळी जोराचा वारा असल्याने काही वेळातच या आगीने रौद्ररूप धारण केले. कारखान्याच्या अग्निशमन दलाने आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला; मात्र वारा असल्याने ही आग आटोक्यात येत नव्हती.
वाघळवाडीचे उपसरपंच जितेंद्र सकुंडे, सदस्य हेमंत गायकवाड, चेतन गायकवाड यांनी घटनास्थळी भेट दिली, सोमेश्वर कारखान्याचे सुरक्षा अधिकारी जगताप आणि त्यांच्या कर्मचाऱ्यांनी ही आग आटोक्यात आणण्याचा आटोकाट प्रयत्न केला. कारखान्याचा अजून एक पंप आणि नीरा ज्युबिलंट कंपनीचा अग्निशमन बंब आल्यानंतर ही आग आटोक्यात आली.